Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’

November 23, 2024

मुंबई: Sanjay Raut On Assembly Results | विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. राज्यातील जनतेचा कल समोर येत आहे. निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने (Mahayuti) आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत असल्याचे दिसून येत आहे. तर मविआ (Mahavikas Aghadi) पिछाडीवर आहे. दरम्यान राज्यात महायुती पुन्हा सत्ता स्थापन करणार असे चित्र दिसत आहे.

दरम्यान हाती आलेल्या या निकालावर शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) नेते संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे. “निकालामागे खूप मोठं कारस्थान दिसत आहे. हा निकाल लावून घेतलेला आहे, जनतेने दिलेला नाही. ७५, १०० जागाही देत नसाल तर हा निकाल ठरवून लावला आहे”,असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ” जो निकाल दिसत आहे त्यावरुन माझ्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला तो म्हणजे काहीतरी गडबड आहे. एकनाथ शिंदे यांना ५६ जागा कोणत्या भरवशावर मिळत आहेत. अजित पवारांना ४० च्या वर जागा मिळत आहेत.

देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी असे काय दिवे लावले आहेत, की त्यांना १२० च्या वर जागा मिळत आहेत. महाराष्ट्रातील वातावरण, कल ज्या प्रकारे होता ते पाहता हा लोकशाहीचा कौल वाटत नाही. हा मान्य कसा करावा असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेलाही पडला असेल.”

ते पुढे म्हणाले, ” शरद पवारांनी महाराष्ट्रात तुफान उभं केलं होतं. त्यांना तुम्ही १० जागा देण्यासही तयार नाही. नेमकी अशी काय गडबड महाराष्ट्रात आहे. हा निकाल जनतेचा कौल आहे हे मानण्यास आम्ही तयार नाही. निवडणुकीत जय-पराजय होत असतं, आम्हाला त्यावर काही बोलायचं नाही. पण लावून घेतलेल्या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसाचा विश्वास बसू शकत नाही”, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.