संगरूर : वृत्तसंस्था – बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुरड्याचा अखेर करुण अंत झाला. तब्बल सहा दिवस अडकलेल्या ‘फतेहवीर’ला वाचविण्यात प्रशासनाला अपयश आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात दीडशे फूट खोल असलेल्या बोअरवेलमध्ये ६ जूनला ४ वाजण्याच्या सुमारास फतेहवीर पडला आणि त्यात तो गेल्या पाच दिवसापासून अडकून पडला होता मात्र पाच दिवस होऊनही मुलाला वाचविण्यासाठी प्रशासन ठोस कार्य करीत नसल्याने ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनही केले आहे. तर प्रशासनाने आता मुळापर्यंत पोहचण्यासाठी केवळ १२ फुटाचे अंतर राहिले आहे मात्र तांत्रिक अडचणी येत असल्याचेही सांगितले जात होते.
त्यात काल सोमवारी या चिमुरड्याचा दुसरा वाढदिवस होता मात्र तो बोअरवेलमध्येच अडकून होता. मंगळवारी प्रशासनाने अथक प्रयत्न करून या चिमुरड्याला बाहेर काढले. चंदिगढ येथील रुग्णालयात त्याला नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
सुखविंदर आणि गगनदीप कौर यांचा फतेहवीर हा एकुलता एक मुलगा होता. दोघांच्या विवाहाला ७ वर्षे झाली आहेत. परंतु, ५ वर्षानंतर त्यांना फतेहवीर हा मुलगा झाला होता. फतेहवीरचा सोमवारी १० जून रोजी दुसरा वाढदिवस होता. परंतु, त्याच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.