मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी गाजलेल्या सैराट या चित्रपटातील परश्याचा मित्र बाळ्या म्हणजे अभिनेता तानाजी गालगुंडे याने केलेल्या भुमिकेमुळे त्याला प्रेक्षक अजूनही विसरले नाहीत. त्याच्या व्यक्तीरेखेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. आता हाच बाळ्या म्हणजे तानाजी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा येणार आहे. यावेळी तो गस्त चित्रपटात प्रेक्षकांना प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या नव्या चित्रपटात तानाजीला पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत.
आपल्या नव्या भूमिकेबद्दल बोलताना तानाजी म्हणाला, गस्त या चित्रपटात मी अमर नावाच्या मुलाची भूमिका साकारत आहेत. अमर हा एका मुलीच्या प्रेमात आहे आणि ज्या गावात तो राहतोय त्या गावात पहारा देत असताना त्या मुलीला चोरुन भेटत असतो. त्यांची प्रेमकथा पुढे काय वळण घेतले हे प्रेक्षकांना या चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळणार आहे. मी पुन्हा एकदा गावाकडच्या मुलाची भूमिका निभावतोय आणि प्रेक्षकांना देखील ती नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. असेही तो म्हणाला.
गस्त हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अनेक जबरदस्त कलाकारांची फौज प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून २८ फेब्रुवारी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता हा चित्रपट झी टॉकीजवर प्रदर्शित होणार आहे.