बहुजननामा ऑनलाईन – भाजप नेते नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी सचिन वाझे प्रकरणावर भाष्य करत ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केलं आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) आणि उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांचे निकटचे संबंध आहेत. त्यामुळंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि ‘सामना’चे संपादक सचिन वाझे यांचा बचाव करत आहेत, असा दावा नीतेश राणे यांनी केला आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी यावर भाष्य केलं.
यावेळी बोलताना नीतेश राणे यांनी, मुंबईत आयपीएलवर (Indian Premier League – IPL) बेटिंग घेणाऱ्यांकडून वाझेंनी मागितलेल्या रकमेमधून सरदेसाई यांनी आपला हिस्सा मागितला होता, असा गंभीर आरोपही केला आहे. नीतेश राणे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ‘सामना’चे संपादक सचिन वाझे यांचा बचाव का करतात, याच्यामागे काही कारणं आहेत. राज्याचे मुख्यमंत्री सचिन वाझेंची वकिली का करतात, याची उत्तरं माझ्याकडे आहेत. गतवर्षी आयपीएलीच स्पर्धा भरवली गेली. सचिन वाझे प्रकरण या स्पर्धेशी कसं निगडित आहे, याची माहिती मला पुढं मांडायची आहे.
पुढं बोलताना नीतेश राणे म्हणाले, आयपीएल चांगल्या उद्देशानं आयोजित केली जात असली तरी त्यात अनधिकृतरित्या सट्टा, बेटिंग घेतली जाते. या स्पर्धेपूर्वी मुंबईतील बेटिंग सट्टा घेणाऱ्यांना सचिन वाझेंचा फोन गेला. तुमच्याबाबत आमच्याकडे सर्व माहिती आहे. जर कारवाई टाळायची असेल तर तुम्ही आम्हाला दीडशे कोटी द्या अशी मागणी केली गेली. तसं न केल्यास तुमच्यावर छापे मारले जातील. तुमची बदनामी, तुम्हाला अटक केली जाईल असं सांगितलं गेलं. वाझेंनी ही रक्कम मागितल्यानंतर वाझेंना आणखी एका व्यक्तीचा फोन गेला. त्या व्यक्तीनं या रकमेतील आमचा वाटा किती, अशी विचारणा केली. या व्यक्तीचं नाव मी विधिमंडळात घेतलं होतं. ती व्यक्ती मंत्रालयापासून सगळीकडे वावरत असते. मुंबई पालिकेतील टेंडर्स त्यांच्याच नावे निघतात. ती व्यक्ती म्हणजे वरुण सरदेसाई आहे, असा दावादेखील त्यांनी यावेळी बोलताना केला.
नीतेश राणे पुढं असंही म्हणाले, वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्यातील संभाषणाची माहिती एनआयएनं (NIA) घ्यावी. वरुण सरदेसाई कुणाचा नातेवाईक आहे याची माहिती एनआयएनं घ्यावी. तसचं हे फोन कुणाच्या सांगण्यावरून केले गेले, कुणी फोन करायला सांगितलं याचीही माहिती समोर आली पाहिजे. वाझेंचे सीडीआर रिपोर्ट, व्हॉट्स अॅप कॉल रिपोर्ट असतील. वाझे आणि सरदेसाई यांच्यातील संभाषण तपासलं पाहिजे. वाझेंचं संभाषण तपासणं जमत नसेल तर वरुण सरदेसाईंचं संभाषण तपासा. या महिन्यात त्यांचं बोलणं झालं होतं का, याची माहिती घ्या, असे अनेक सल्लेही त्यांनी यावेळी बोलताना केले.