बहुजननामा ऑनलाईन – अंबानीच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना एनआयएने अटक केली आहे. या प्रकरणाचा NIA ने तपास सुरु केल्याने वाझेंच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान या प्रकरणात शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब गृह खात्यात वारंवार हस्तक्षेप करत आहेत. याची तक्रार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडे केल्याचे समजते. देशमुखांनी केलेल्या तक्रारीमुळे शरद पवार शिवसेनेवर अन् मुख्यमंत्र्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता पवार यामध्ये व्यक्तीश: लक्ष घालण्याची शक्यता आहे.
परिवहन मंत्री परब गृह खात्यात वारंवार हस्तक्षेप करत आहेत. वाझे प्रकरणात मुंबई पोलीस दलातल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परब यांची भेट घेतली. यामध्ये गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांसह आणखी काही बड्या अधिकाऱ्यांचा समावेश होता असे एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तात म्हटले आहे. सध्या एनआयएच्या अटकेत असलेले वाझेंचा शिवसेनेने बचाव केला आहे. खुद्द मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील वाझेंची पाठराखण केली आहे. त्यामुळे वाझेंना वाचवण्यासाठी शिवसेना गृहखात्यात हस्तक्षेप करत असल्याची चर्चा आहे. तसेच अंबानींच्या घराबाहेर आढळलेली कार, यात वाझेंची संशयास्पद भूमिका यामुळे विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. याबाबत पवारांना विचारणा केली असता त्यांनी देशमुख यांची पाठराखण केली. गृह मंत्रालयाने जबाबदारी उत्तमपणे सांभाळली आहे. चुकीचे काम करणाऱ्या व्यक्तींना उघड पाडण्याचे काम त्यांनी केले असल्याचे पवार म्हणाले. एखाद्या एपीआयच्या अटकेचा परिणाम सरकारवर होणार नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे.