नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डॉक्टरला पृथ्वीवरील देव मानतात, ते उगाच नाही, रशियाच्या ब्लॅगोव्हचेन्स्क शहरात डॉक्टरांनी वास्तवात देवदूत बनून हृदयविकाराच्या रुग्णाचे प्राण वाचवले आणि तेही अश्या परिस्थितीत जेव्हा रुग्णालयात भीषण आग लागली होती. सर्वत्र फक्त धुराचे लोट होते, परंतु डॉक्टर विचलित झाले नाहीत आणि रुग्णालाही सोडून ऑपरेशन थिएटरपासून पळून गेले नाही. डॉक्टर रुग्णाची शस्त्रक्रिया करतच राहिले.
ही घटना रशियाच्या ब्लॅगोव्हशेन्स्क शहरातील सर्वात जुन्या रुग्णालयाची आहे. शुक्रवारी रुग्णालयात भीषण आग लागली. परंतु, रुग्णालयात आग लागली तेव्हा आठ डॉक्टरांची टीम ऑपरेशन थिएटरमध्ये एका रुग्णाची ओपन हार्ट सर्जरी करत होती. या तणावग्रस्त परिस्थिती डॉक्टरांनी वैद्यकीय धर्माचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतला. या जळत्या हॉस्पिटलमध्ये रूग्णाची ओपन हॉर्ट सर्जरी दोन तास चालूच राहिली, परंतु प्राण वाचविण्यासाठी एकाही डॉक्टरने रुग्णालयातून पळून जाण्याचा विचार केला नाही. हॉस्पिटलमधील आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला दोन तास लागले आणि बराच काळ डॉक्टर रूग्णालयात काम करत राहिले.
A group of doctors and nurses stayed in a surgery room to complete an open-heart surgery as plumes of smoke rose from a hospital in eastern Russia after a fire broke out https://t.co/iGZf2xrGFR pic.twitter.com/P3bwq0MBrW
— Reuters (@Reuters) April 2, 2021
‘आम्हाला रुग्णाचे प्राण वाचवायचे होते’
रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्याकडे रुग्णाचे ऑपरेशन करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. ऑपरेशन थिएटरमध्ये ते रुग्णाला सोडून जाऊ शकत नव्हते. रुग्णावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर व्हॅलेंटीन फिलाटोव्ह म्हणाले की, ते हार्ट बायपास ऑपरेशन करत होते आणि आम्हाला ऑपरेशन यशस्वीरित्या करायचे होते. आमच्याकडे पर्याय नव्हता. यशस्वी ऑपरेशननंतर आता रुग्णाची प्रकृती ठीक झाली आहे आणि त्याला दुसर्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर आता रुग्णालयातील डॉक्टरांचे कौतुक केले जात आहे आणि लोक खरोखरच या डॉक्टरांना देवाचे रूप म्हणत आहेत.
अहवालानुसार रुग्णालयाच्या छताला आग लागली असून छताचा वरचा भाग लाकडाचा बनविला आल्याने आग खूप वेगाने पसरत होती. रुग्णालयात लागलेल्या आगीत 128 लोकांना तातडीने रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले. रशियाच्या आपत्कालीन परिस्थिती मंत्रालयाने म्हटले की, हे रुग्णालय 1907 मध्ये बांधले गेले होते आणि रुग्णालयाची ही इमारत खूप जुनी आहे. परंतु, रुग्णालयात आग लागल्यामुळे कोणीही जखमी झाले नाही आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही.