पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिवहन कार्यालयानं मूळ गाडी मालकाच्या परवानगीशिवाय चारचाकी गाडीची विक्री करण्यास परवानगी दिली. यानंतर परेशान झालेल्या गाडीमालकाने 3 हजार वेळा नितीन गडकरी यांना ट्विट करत प्रश्न विचारला आहे. सचिन गव्हाणे असं या गाडी मालकाचं नाव आहे. सचिनने आपल्या भावाला चालवण्यासाठी टेम्पो दिला होता. मात्र अचानक त्याच्या भावाने टेम्पो विकला आणि तो पळून गेला. सचिनच्या हे लक्षात येताच त्यांने टेम्पोच्या विक्रीची चौकशी केली. यावेळी एक धक्कादायक प्रकार समोर आला.
माहितीच्या अधिकारात सचिनने सर्व व्यवहाराची माहिती मागविल्यानंतर त्याला समजलं की, परिवहन कार्यालयातील अधिकारी आणि दलालांच्या मदतीने भावाने आपला टेम्पो विकला आहे. सचिनने पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु परिवहन कार्यालय आणि पोलीस यांच्यापैकी कोणीच दखल घेत नाही असा आरोपही त्याने केला आहे.
सचिनने उपप्रादेशिक अधिकारी आनंद पाटील यांना याबाबात विचारले. तेव्हा त्यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले. ही चौकशी किती दिवस चालणार असा प्रश्न सचिनने विचारला आहे. इतकेच नाही तर त्याने ट्विट करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही ट्विटरवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. गडकरींनाही सचिनने ट्विटरवरून प्रश्न विचारले आहेत. सचिनने एक किंवा दोन नाही तर तब्बल 3 हजार ट्विट केले आहेत. पंरतु त्याची दखल घेतली गेली नाही. 1 सप्टेंबर पासून वाहतूक नियम कडक झाले आहेत. काही ठिकाणी वाहन धारकांना ट्राफिक पोलिसांचा त्रासही सहन करावा लागत आहे. काहींना दमदाटी करण्याचे प्रकारही समोर येताना दिसत आहेत. याशिवाय काहींना चुकीच्या पावत्याही पाठवल्या जात आहेत.