मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – सुशिक्षित मूर्खांचा बाजार काय असतो हे तुम्हाला या बातमीतून कळेल. तुम्ही जर कोणत्याही रेल्वे स्थानकात प्रवेश केला तरी तुम्हाला वारंवार सूचना ऐकायला मिळतील. रेल्वे रूळ ओलांडू नका, रेल्वे रुळावरून चालू नका, रेल्वे फलाटावर येत असताना रूळ आणि फलाटापासून दूर उभे राहा, ट्रेनमधून प्रवास करत असताना दरवाजात लटकू नका, रेल्वेमधून स्टंट्स करू नका. अशा घोषणा सतत प्रशासनाकडून केल्या जातात. पण प्रवाशांच्या डोक्यात काहीही प्रकाश पडत नाही.
दरम्यान, दहिसर रेल्वे स्टेशनवर एक घटना घडली आहे. दहिसरमध्ये रेल्वे रुळ ओलांडताना एक प्रवासी लोकलखाली येता येता वाचला आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना स्टेशनवरील CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. सामोरं ट्रेन येतेय ही दिसत असताना हा प्रवासी रेल्वे रुळ ओलांडत होता. रेल्वे रुळ ओलांडत असताना त्याच्या पायातून बूट निसटला. हा बुट घेण्यासाठी हा सदर माणूस पुन्हा मागे फिरला. अशात समोरुन एक लोकल ट्रेन धडधडत येतच होती. मात्र तरीही हलगर्जीपणा करत या प्रवाशाने आपला निसटलेला बूट पुन्हा घालत रेल्वे रुळ ओलांडण्याचा मूर्खपणा केला. इतक्यात तिथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसाने या प्रवाशाला प्लॅटफॉर्मवर ओढत त्याचे प्राण वाचवले.
यावेळी जराही उशीर झाला असता तर त्याच उपस्थित पोलिसाला या माणसाचा मृतदेह उचलण्याची वेळ आली असती आणि मोठा अनर्थ घडला असता. अशा लोकांकडे पाहून तुम्हाला ते नुकतंच व्हायरल झालेलं “पता नहीं जी कौनसा नशा करता हैं” हे गाणं नक्की आठवेल. सध्या कोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी नाही. अशात लोकलमध्ये आणि फलाटांवर आधीएवढी गर्दी देखील होत नाही. तरीही काही नागरिक सध्या आपल्या घाईगडबडीमुळे नियम धाब्यावर बसवतातच. अशाच प्रकारच्या एका महाभागाने रुळ ओलांडण्याचा मूर्खपणा केला आणि स्वतःचा जीव धोक्यात घातला.