अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

Rohit Pawar
January 16, 2021

बहुजननामा ऑनलाइन टीम –  रिपब्लिकन वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील संवाद उघडकीस आला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाला (भाजप) कडक सवाल केला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपला यासंदर्भात प्रश्न विचारला आहे.

कथित पत्रकाराला भाजपच्या वरपासून तळापर्यंतच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचं त्यांच्या चॅटिंगवरुन दिसतंय. भाजपच्या प्रसिद्धीसाठीच त्यांना ताकद दिली जात होती का? एखाद्या निर्णयापूर्वीच अशा प्रकारे माहिती लिक होत असेल तर देशविरोधी शक्तीही याचा फायदा उठवू शकतात. हे लोकशाहीला घातक आहे, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र याची जोरदार चर्चा सुरू आहे. या दोघांमधील संवादात मंत्र्यांबद्दलही आक्षेपार्ह विधाने करण्यात आली आहेत. यासह बालाकोट एअर स्ट्राइकबाबतही या दोघांमध्ये संवाद झाल्याचे उघडकीस आले आहे.

अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील संवाद समोर आल्यानंतर सोशल मीडियावर टीकेचा मारा करण्यात आला. हाच विषय ट्रेडिंगवरही होता, अशी माहिती मिळाली आहे. अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या संवादात केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा उल्लेख निष्क्रिय असा करण्यात आला आहे. समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या संभाषणात सर्व मंत्री आपल्याबरोबर आहेत, अशा शब्दांत गोस्वामी यांनी पार्थ यांना दिलासा दिल्याचे समोर आले आहे.