बहुजननामा ऑनलाईन – “छत्रपती या उपाधीवर संपुर्ण महाराष्ट्र मनापासून प्रेम करतो. त्या उपाधी मागे असणारा व्यक्ती नाही तर ती उपाधी मला महत्वाची वाटते. अशा वेळी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मोदी साहेबांच्या उपस्थितीत होणार असल्याचं सांगण्यात येतं, पण तो कार्यक्रम एका नेत्यांच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या लॉनमध्ये आयोजित केला जातो. भारतीय जनता पक्षाला मला एकच सांगायच आहे, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून व्यक्तीहून अधिक त्या उपाधीचा आम्ही मान ठेवला आहे. कोणतही राजकारण न करता मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो की, जसा महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक तो मान ठेवतो तसाच आपणही तो मान ठेवावा.” शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट लिहून त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपती या उपाधीचा मान राखला गेला पाहिजे , असे त्यांनी या फेसबुकपोस्ट मधून सुचविले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या पक्षप्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार होते. मात्र त्यांना उपस्थित राहता आले नाही. या कारणास्तव नरेंद्र मोदींनी छत्रपती यांना या उपाधीचा मान राखता आला नाही. या कारणास्तव रोहित पवार यांनी या प्रतिक्रिया दिल्या असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान लोकहितासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला असून हा निर्णय निस्वार्थीपणे घेतला. मोदी -शहा देशाच्या विकासासाठी, लोकशाही मजबूत करण्यासाठी पावले उचलत आहेत. त्यांच्या या कार्याला भारावून मी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले. भोसले यांच्या पक्षप्रवेशावेळी केंद्रिय मंत्री रामदास आठवले, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील इतर दिग्गजही उपस्थित होते.