मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने गुन्हा दाखल केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या या कारवाईमुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. याशिवाय राजकारणातही यामुळे खळबळ उडाली आहे. पवारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
त्यावेळी शरद पवारांचे नातू रोहित पवार म्हणाले की, “लहानपणी क्रिकेट खेळताना एखादा चांगलं खेळत असेल तर लगेच एखादा चिडका मुलगा यायचा. माझी बॅट, माझा बॉल म्हणून चिडून बॅट-बॉल घेऊन जायचा. तसंच EDचं प्रकरण सुरू असल्याचा संशय येत आहे. चांगलं खेळता येत नसेल तर काहीही करून चिडायचं.” असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
पुढे रोहित पवार म्हणाले, “फक्त एक गोष्ट लक्षात असू द्या… आपला गडी लई भारी आहे.” असे म्हणत रोहित यांनी विश्वास व्यक्त केला आहे. राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांवर सक्तवसुली संचलनालयाने गुन्हा दाखल केला आहे.
Visit : bahujannama.com