पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – कुख्यात गुंड गजानन मारणेची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर रॅली कढून उर्से टोलनाक्यावर दहशत माजवली म्हणून गजा मारणे आणि त्याच्या साथिदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी टोल नाक्यावरील फुड मॉलमधील पाण्याच्या बाटल्या आणि वडापाव पैसे न देता जबरदस्तीने घेतल्याप्रकरणी गजा मारणे आणि त्याच्या साथिदारांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 फेब्रुवारी रोजी तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर गुंड गजानन मारणे याने मिरवणुक काढली. त्यात वाहनांचा मोठा ताफा होता. हा ताफा उर्से टोलनाक्यावर आला त्यावेळी मारणे याच्या समर्थकांनी आरडाओरडा करुन फटाके वाजवले. याशिवाय याचे ड्रोनच्या सहाय्याने चित्रीकरण करुन दहशत माजवली. याप्रकरणी 16 फेब्रुवारी रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची पाहणी केली. त्यावेळी इतर वाहनांना बाजूला करुन टोल न देता गजानन मारणे आणि त्याचे साथिदार वाहने घेऊन गेले. त्यापूर्वी टोलनाक्यावर असलेल्या फुड मॉलमधील पाण्याच्या बाटल्या आणि वडापावचे पैसे न देता जबरदस्तीने घेतल्याचे समोर आले. हा प्रकार समोर आल्यानंतर गजा मारणेसह त्याच्या साथिदारांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती आयुक्तांनी दिली.