RO Water Is Also Contaminated In Pune | ‘आरओ’ चेही पाणी दूषित असल्याचे निष्पन्न, महापालिकेच्या तपासणीत 30 पैकी 19 प्रकल्पांचे पाणी अशुद्ध; कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश

पुणे : RO Water Is Also Contaminated In Pune | सिंहगड रस्ता खासगी पाणी शुद्धिकरण प्रकल्पातील (आरओ प्लांट) पाणी देखील दूषित आहे. ३० पैकी तब्बल १९ ‘आरओ’ प्रकल्पातील पाणी दूषित असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर महापालिका प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली असून, खासगी टँकर, आरओ प्रकल्पांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले आहेत.
सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, धायरी, डीएसके विश्व, आंबेगाव या गावांमध्ये गुईलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळले होते. त्यानंतर महापालिकेच्या विहिरीतील पाण्याची तपासणी केल्यानंतर पाणी दूषित नसल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर खासगी टँकर भरणा केंद्र, खासगी टँकरमधील पाण्याची तपासणी केल्यानंतर संबंधित पाण्यात ई-कोलाय व अन्य जीवाणू असल्याचे तपासणी अहवालातून समोर आले होते.
त्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून संबंधित टँकर भरणा केंद्र व खासगी टँकर यांना केवळ लेखी पत्र दिले होते. तसेच त्यांना पाणी शुद्धिकरणासाठी ब्लिचिंग पावडर नेण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केले होते. मात्र, कुठल्याही प्रकारची कडक कारवाई करण्याचे धाडस पाणीपुरवठा विभागाने केले नव्हते. संबंधित गावांमध्ये शुद्ध पाणी म्हणून आरओ प्लांट चालकांकडून पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जात होता. संबंधित पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले होते.
दरम्यान ३० आरओ प्रकल्पातील नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी १९ प्रकल्पांमधील पाणी दूषित असल्याचा अहवाल महापालिकेस प्राप्त झाला आहे. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी संबंधित खासगी टँकर, आरओ प्लँटचालक यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागास दिले आहेत.