धुळे : बहुजननामा ऑनलाईन – अल्पवयीन मुलीची छेड काढल्यावरून दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत एकाचा मृत्यू झाला. दोंडाईचा येथे बुधवारी (दि. 31) रात्री ही घटना घडली. संशयित आरोपींच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यावर केलेल्या दगडफेकीत काही 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले. तर पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी केलेल्या गोळीबारात दोघे जखमी झाले आहेत. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
शाहबाज शाह गुलाब शाह (वय 45 रा. दोडाईचा ) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोंडाईचा येथील एका अल्पवयीन मुलीची छेड दोन मुलांनी काढली होती. हा प्रकार पीडित मुलीने तिच्या भावाला सांगितल्यानंतर त्याने छेड कढणाऱ्या दोघा मुलांना चोप देऊन त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले होते. याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरा पॉक्सो कायद्यान्वये दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याचवेळी संशयित आरोपींचे समर्थक मोठ्या संख्येेने पोलीस ठाण्यात आले. जमावाने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व अन्य कर्मचाऱ्यांवर दडपण आणले. काही वेळातच वाद विकोपाला गेला. जमावाने दोघां संशयितांना पोलिसांच्या ताब्यातून सोडवित ठाण्यावर दगडफेक सुरु केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलीस निरीक्षक वारे यांनी गोळीबार केला. यात दोघे जण जखमी झाले. जमावाच्या हल्ल्यात वारे यांच्यासह 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करताना पुन्हा वाद निर्माण होऊन दोन गटांत हाणामारी झाली. यामध्ये दोंडाईचा येथील एक तरुण गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.