बहुजननामा ऑनलाईन – विरारच्या रेल्वे स्थानकात एका गरोदर महिलेला लोकलमधून रुग्णालयात पोहचविण्यासाठी लोकलच्या डब्यापर्यंत एका व्यक्तीने रेल्वे स्थानकातच रिक्षा घातली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी त्या रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल केला परंतु या प्रकरणी न्यायालयाने रिक्षाचालकाला दिलासा दिला असून त्याच्यावरील सर्व गुन्हे माफ करण्यात आले आहे.
नक्की काय आहे प्रकार
पावसाने जोर धरल्याने मुंबई शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. याच दरम्यान रविवारी सकाळी ९ च्या सुमारास एक गरोदर महिला पतीसह मुंबईतील रुग्णालयात निघाली होती. मात्र गर्भवती महिलेला लोकल सुरु होण्याआधीच कळा सुरु झाल्या, त्यामुळे त्या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. त्यादरम्यान उपस्थित एका पोलिस कर्मचाऱ्यांनी सागर गावड या रिक्षाचालकास मदतीसाठी बोलवले. यानंतर महिलेला नेण्यासाठी रिक्षा स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर २ वर महिलांच्या डब्याजवळच नेण्यात आली. महिलेला रुग्णालयात याच रिक्षातून पुढे नेण्यात आले. जवळच्याच संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर अवघ्या १० मिनिटातच गर्भवती महिलेची सुखरूपपणे प्रसूती करण्यात आली.
मात्र या प्रकरणामुळे लोहमार्ग पोलिसांनी रिक्षा चालकाच्या विरोधात रेल्वे कायदा १५४ आणि १५९ अनव्ये गुन्हे दाखल करण्यात आले. सोमवारी जेव्हा न्यायालयासमोर हे प्रकरण गेले तेव्हा सर्व प्रकार कळाल्यानंतर मदतीसाठी रिक्षा रेल्वे स्थानकात नेल्याचे स्पष्ट झाले. यानंतर सागर या रिक्षाचालकावरील सर्व गुन्हे न्यायालयाने माफ केले.