पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहर पोलीस दलातून निवृत्त झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते (वय 61) यांचे कोरोनामुळे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने पोलीस दलातून हळहळ व्यक्त होत आहे.
बाजीराव मोहिते यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना जहागीर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना आज त्यांचे निधन झाले. दीड वर्षांपूर्वी ते पुणे शहर पोलीस दलातून निवृत्त झाले होते.
बाजीराव मोहिते पोलीस दलात भरती झाल्यानंतर पुणे शहर पोलीस दलातूनच त्यांच्या कार्याची सुरुवात झाली होती. त्यांची पहिली पोस्टिंग येरवडा पोलीस ठाण्यात होती. उपनिरीक्षक म्हणून त्यांनी काम केले. यानंतर पुण्यात पोलीस निरीक्षक म्हणून काम केले. तर पुणे, ग्रामीण, मुंबई तसेच इतर शहरात त्यांनी काम केले आहे. निवृत्त होत असताना ते कोथरुड डिव्हीजनचे सहाय्यक पोलीस आयुक्त होते. मोहिते यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अत्यंत मन मिळवू आणि कामात तरबेज म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने पोलीस दलाकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.