Retired ACP Vivek Muglikar | मीरा भाईंदरचे ACP डॉ.विवेक व.मुगळीकर यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा आणि डिंपल पब्लिकेशनतर्फे त्यांच्या तुझा एक थेंब या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन

Retired ACP Vivek Muglikar | Mira Bhayandar ACP Dr. Vivek V. Muglikar's service completion ceremony and release of his first book 'Tuja Ek Themba' by Dimple Publications

Retired ACP Vivek Muglikar | मीरा भाईंदरचे ACP डॉ.विवेक व.मुगळीकर यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा आणि डिंपल पब्लिकेशनतर्फे त्यांच्या तुझा एक थेंब या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन संत तुकाराम महाराज यांचे वंशज आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या शुभहस्ते पिपंरी चिंचवड, पुणे येथील ग.दि.माडगूळकर नाट्यगृहात झाले.

यावेळी संत एकनाथ महाराज यांचे वंशज ह.भ.प.योगिराज महाराज पैठणकर (श्री क्षेत्र पैठण), पुण्याचे महसूल विभाग आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ,मराठवाडा मित्रमंडळ, पुणे, कार्याध्यक्ष डॉ. भाऊसाहेब जाधव, पिंपरी चिंचवडचे पोलिस उपायुक्त शिवाजी पवार आणि डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे उपस्थित होते.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रात भक्तिमय वातावरणात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे हरिनामाचा जप करीत लाखो भक्तांची पालखी निघाली आहे.आणि पुण्यात संत तुकाराम महाराज यांचे वंशज आणि संत एकनाथ महाराज यांचे वंशज या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपस्थित असणे. हि मोठी भाग्याची गोष्ट आहे.

सत्कार सोहळा आयोजन समितीतर्फे प्रास्ताविक ज्येष्ठ लेखक डॉ.रवींद्र तांबोळी यांनी केले.सुरुवातीलाच विनोदाचे षटकार,चौकार मारीत विनोदी पद्धतीने भाषण करून त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात दमदारपणे सुरुवात केली. अशोक मुळे यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त डिंपल पब्लिकेशनच्या वाटचालीचा आढावा घेतला.

यावेळी डॉ विवेक मुगळीकर आणि सौ.मुगळीकर यांचा आदरणीय डॉ.सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रकाशनानिमित्ताने सत्कार करण्यात आला.तसेच सन्मान सोहळा आयोजन समिती तर्फेही डॉ विवेक मुगळीकर त्यांची आई उषा मुगळीकर, पत्नी सौ मंजुषा मुगळीकर यांचाही भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर मित्रपरिवार ,पत्रकार ,साहित्यक्षेत्रातील जाणकार,आप्तेष्ट उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.देवदत्त साने यांनी केले.आभारप्रदर्शन प्रकाश इंगोले यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजन समितीतले राजेंद्र कुंटे (अप्पर पोलिस अधीक्षक से. नि.), विठ्ठल कदम, डॉ मारूती आवरगंड,सत्यजित चौधरी,राम चिंचोले,गजानन चिंचवडे,रमेश श्रीमनवार,प्रकाश इंगोले, मुनाफ तरसगार, जब्बार शेख,किशोर पाटील,रंगनाथ उंडे (से. नि. स. पो. आ.), किरण बुचडे, ऍड. आतिश भालसिंग , रविराज पाटील तसेच मराठवाडा मित्रपरिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

डॉ मुगळीकर यांनी आपल्या मनोगतात आपल्या कारकीर्दीतील महत्त्वाचे प्रसंग सांगितले. तसेच कविता लेखनाची पार्श्वभूमी सांगितली. “तुझा एक थेंब ” हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित करण्यास जरी वेळ लागला असला तरीही यापुढे साहित्य सेवेला प्राधान्य देणार असे प्रतिपादन त्यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे तसेच संयोजन समितीचे त्यांनी आपल्या भाषणातून आभार व्यक्त केले.


संत साहित्याचे अभ्यासक डॉ सदानंद मोरे यांनी आपल्या भाषणातून डॉक्टर विवेक मुगळीकर यांच्या कवितेचे रसग्रहण करून कौतुक केले तसेच मुगळीकर यांनी यापुढे आपल्या साहित्यातून पोलीस समाजजीवनाची नव्याने मांडणी करावी असा सल्लाही दिला. ह. भ. प. योगीराज महाराज गोसावी यांनी कवी चे प्रकार सांगून मुगळीकर यांनी आपल्या कवितांतून रसिकांना आनंद मिळवून द्यावा असे प्रतिपादन केले.


विभागीय आयुक्त (महसूल) डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी डॉक्टर मुगळीकर यांच्याशी कॉलेज जीवनापासून असणाऱ्या मित्रत्वाचा दाखला देऊन त्यांच्या “भूकंप” या कवितेतील चित्रण वास्तव असून मी त्या भूकंपाचा साक्षीदार होतो हे विशेषत्वाने नमूद केले.

डॉक्टर भाऊसाहेब जाधव यांनी आपल्या भाषणात डॉक्टर विवेक मुगळीकर यांनी मराठवाड्यातून पुणे पिंपरी चिंचवड येथे येऊन आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन केले. मुगळीकर यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये विविध कामगिरीसाठी एकूण 1037 बक्षिसे मिळवली असून विशेष सेवा पदक, पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह ,राष्ट्रपतींचे पोलीस पदक असे सन्मान प्राप्त केले आहेत .

आपल्या पोलिस सेवेत त्यांनी कारकिर्दीत सेलू जी .परभणी येथील दरोडा ,परभणी जवळील माजी आमदाराच्या घरावरचा दरोडा,नांदेड येथील गुरु ता गद्दी या शीख धर्मियांच्या आंतरराष्ट्रीय त्रिशताब्दी महोत्सवाच्या सुरक्षा व्यवस्था नियोजनामध्ये मोलाची कामगिरी,पिंपरी चिंचवड येथे असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट बेटिंग चे रॅकेट, सहा कोटींचे रक्तचंदन तस्करीचा पर्दाफाश, एटीएम जाळणारे व उचलून घेऊन जाणारी हरियाणवी टोळी जेरबंद , ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या कुख्यात गुन्हेगारास अटक करून एक कोटी 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त अशी विविध प्रकारची उल्लेखनीय कामगिरी केली. अनेक दरोडे जबरी चोरी खुनाचे गुन्हे उघडकीस आणले .तसेच पिंपरी पोलिस स्टेशन येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना pocso कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या तपासातील ८ गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा झाली होती .

नांदेड येथे महिला कक्षात कार्यरत असताना महिला साह्य कक्ष्याच्या कामकाजाचे अवलोकन करून तत्कालीन महिला आयोगाच्या अध्यक्षा कै रजनीताई सातव यांनी नांदेड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्याचे आदेश दिले होते. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलिसांच्या “ज्येष्ठानुबंध ” या उपक्रमाची त्यांनी हिंजवडी पोस्ट येथे असताना सुरुवात केली होती.

तसेच मीरा-भाईंदर वसई-विरार या आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर काम करत असताना झोन १ ( मीरा-भाईंदर) मधील सर्व कार्यालय आणि पोलिस स्टेशन आयएसओ प्रमाणित करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता त्या योगे मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयास माननीय मुख्यमंत्री यांच्या सात कलमी पोलीस सेवा सुधार कार्यक्रमांतर्गत पहिले बक्षीस प्राप्त झाले होते.

आपल्या पिंपरी चिंचवड पोलिस दलातील कारकिर्दीत त्यांनी मोक्का कायद्यानुसार आणि एमपीडी अन्वये अनेक गुन्हेगार टोळ्यांवर कारवाई करून तसेच गुन्हेगारांची धिंड काढून गुन्हेगारांवर जरब बसवली . कोरोना काळातही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून जनतेची वाहवा मिळवली होती. त्याच बरोबर महिला मेळावे, ज्येष्ठ नागरिक मेळावे, मुद्देमाल प्रदान कार्यक्रम ,साहित्य संमेलन क्रीडा स्पर्धा इ .चे आयोजन करून कम्युनिटी पोलिसिंग यावर त्यांनी भर दिला होता. अशा प्रकारे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पिंपरी-चिंचवडकरानी आकुर्डी येथील ग.दि.माडगूळकर नाट्यगृहात त्यांचा जाहीर सन्मान सोहळा आयोजित करून त्यांना त्यांच्या कार्याची पावती दिली आहे.