पुणे : बहुजननामा ऑनलाईन – धनगरांचा इतिहास तरुण पिढीला समजावा यासाठी शनिवार वाड्याला पेशवे-होळकर वाडा असे नाव द्यावे, अशी मागणी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. दुसरे बाजीराव पेशवे आणि यशवंतराव होळकर यांच्यात हडपसर येथे झालेल्या युद्धात बाजीराव पेशव्यांचा पराभव झाला होता. होळकरांनी युद्धात एकहाती विजय मिळवल्यानंतर दुसरे बाजीराव पेशवे कोकणाकडे पळाले. हा धनगरांचा इतिहास, तरूण पिढीला समजावा, यासाठी शेंडगे यांनी ही मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना शेंडगे म्हणाले, हडपसर येथे यशवंतराव होळकर यांच्या पेशव्यांवरील विजयाच्या स्मृतीप्रित्यर्थ सर्व धनगर समाज बांधवांना एकत्र आणून विजयस्तंभ उभारण्यात येणार आहे. दुसरे बाजीराव पेशव्यांनी होळकरांना साम्राज्यावरील हक्क नाकारल्याने यशवंतराव होळकर यांनी हडपसर येथे पेशव्याविरुद्ध 1802 मध्ये लढाई केली. यामध्ये पराभूत झालेल्या बाजीराव पेशव्यांनी पुण्यातून पळ काढला. तेव्हापासून त्यांना पळपुटे बाजीराव असे संबोधले जाते, असे शेंडगे म्हणाले.
रघुनाथराव इंग्रजांना मिळाले
नारायण पेशव्यांच्या खूनाचा आरोप असलेले रघुनाथराव पेशवे आणि आनंदीबाई यांचा मुलगा दुसरा बाजीराव होय. रघुनाथराव इंग्रजांना मिळाल्यामुळे इंग्रज आणि मराठा यांच्यात युद्ध झाले. आनंदीबाई आणि रघुनाथ नजरकैदेत असताना दुसर्या बाजीरावाचा जन्म झाला. दौलतराव शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या मदतीने दुसर्या बाजीरावाला पेशवाईची वस्त्र मिळाली. पुणे कारभार दौलतराव शिंदे, बाळोजी कुंजीर आणि सर्जेराव घाटगे पहात होते.
होळकरांच्या छावणीवर हल्ला
मल्हारराव होळकर हे पेशव्यांचेच सरदार होते, परंतु पेशव्यांनी दौलतराव शिंदेंच्या मदतीने बेसावध असलेल्या मल्हारराव होळकरांच्या छावणीवर हल्ला केला. यावेळी दौलतरावांच्या सैन्याच्या हातून मल्हाररावांचा खून झाला. या हल्ल्यातून यशवंतराव होळकर बचावले. त्यानंतर त्यांनी पेशवाईविरोधात युद्ध करण्याचे ठरवले.
होळकरांकडून पेशव्यांचा पराभव
1802 मध्ये उत्तरेतून यशवंतराव होळकर पुण्यावर चाल करुन आले. दौलतराव आणि दुसरे बाजीराव यांच्या फौजेत हडपसर येथे युद्ध झाले. युद्धात पराभव होत असल्याचे पाहून दुसरा बाजीराव पळाला. प्रथम तो रायगड आणि नंतर वसई येथे इंग्रजांच्या आश्रयाला गेला.
Visit : bahujannama.com