अहमदनगर : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बाेठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी ११ डिसेंबरला जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळ बाेठे याने ॲड. यांच्या माध्यमातून गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून जिल्हा सत्र न्यायालयात सोमवारी अर्ज केला होता. त्यावर मंगळवारी न्यायाधीश एम. आर. नातू यांच्या न्यायालयासमोर सुनावणी पार पडली असून, जामीन अर्जावर सरकारी वकील व तपासी अधिकाऱ्यांचे म्हणणे मागवण्यात आले आहे. म्हणणे सादर झाल्यानंतर पुढील सुनावणी ११ डिसेंबरला होणार आहे.
खरेतर, राजकीय क्षेत्रातील महिलेची भरदिवसा कुटुंबीयांसमोर हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे फिरवत मारेकऱ्यांना पकडले. मारेकऱ्यांची चौकशी केली असता, पत्रकार बाळ बाेठे यानेच ६ लाख रुपये देऊन रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती उघडकीस आली होती. त्यानंतर तो शहरातून पसार झाला.
दरम्यान, मागील चार पाच दिवसांपासून पोलिसांची पाच पथके त्याचा शोध घेत आहेत. बोठे हॉटेल, लॉजमध्ये लपल्याची शक्यता धरून पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत शिर्डीसह नाशिक व अन्य शहरांत शोध घेतला. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत आहे. बोठे याला कोण मदत करू शकते याचा पोलीस अंदाज घेत असून, त्याच्या जवळच्या मित्रांवर व व्यक्तींवर लक्ष केंद्रित केलं आहे.