औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन टीम : काही दिवसापूर्वी आलेला ‘थ्री इडियट्स’ चित्रपट सर्वांचा आठवत असेल. या चित्रपटात अभिनेता अमीर खानने रँचो ची भूमिका बजावली होती. त्यामध्ये त्याने अभिनेत्रीच्या बहिणीची व्हॅक्युम क्लीनरच्या मदतीने प्रसूती केली होती. व्हॅक्युम क्लीनरच्या मदतीने प्रसूतीचे दृश्य आपण चित्रपटात पाहिलं होत पण प्रत्यक्षातही असं घडलं आहे. केवळ एकच नाही तर ‘व्हॅक्युम’ने तब्बल ३२५ प्रसूती झाल्या आहेत. वर्षभरात या प्रसूती करणारे रँचो आहेत औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील डॉक्टर्स.
घाटी रुग्णालय हे मराठवाड्यातील गोरगरीबांसाठी आधारवड आहे. येथील डॉक्टरांनी २०२० या संपूर्ण वर्षात सिझेरियनशिवाय व्हॅक्युमच्या मदतीने गुंतागुंतीच्या ३२५ प्रसूती केल्या आहेत. त्यामुळे घाटीतील डॉक्टर एक प्रकारे खरेखुरे रँचो आहेत, असे म्हण्टले तर वावगे ठरणार नाही. घाटी रुग्णालयात वर्षाला १४ हजार ते १८ हजार प्रसूती होतात. म्हणजे महिन्याला १८ ते ४४ अशा प्रकारच्या प्रसूती डॉक्टर करतात. या प्रकारच्या प्रसूतीला वैद्यकीय क्षेत्रात ‘इस्ट्रुमेंटल डिलिव्हरी’ असे म्हटले जाते.
या संदर्भात बोलताना घाटी रुग्णलायातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले की, घाटीत अनेक वर्षांपासून व्हॅक्युम प्रसूती होते. वर्षभरात ३२५ प्रसूती झाल्या. अतिशय सतर्कपणे ही प्रसूती करावी लागते. थोडीही चूक आई आणि बाळासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे केवळ तज्ज्ञ डॉक्टरच ही प्रसूती करतात. असे त्यांनी सांगितले.
का केली जाते व्हॅक्युम प्रसूती?
ज्यावेळी गर्भपिशवीचे तोंड पूर्ण उघडते. त्यावेळी बाळाचे डोके खाली सरकते. परंतु नंतर डोके बाहेर यायचे थांबते. अशा वेळी सिझेरियन करणे अशक्य होते. त्यावेळी नैसर्गिक प्रसूतीसाठीही वाटही पाहता येत नाही. अशा वेळी व्हॅक्युम, चिमटा वापरून प्रसूती केली जाते. महत्त्वाचे म्हणजे गर्भपिशवीचे तोंड उघडले नाही तर अशी प्रसूती करता येत नाही.
दरम्यान, अशा प्रकारची प्रसूती झाल्यानंतर केवळ २ टक्के बाळांना उपचारांसाठी ‘एनआयसीयू’त दाखल करावे लागले, असे डॉक्टरांनी सांगितले. व्हॅक्युम डिलिव्हरीमुळे सिझेरियन प्रसूती करण्याचे टळते. मात्र या प्रकारची प्रसूती केवळ तज्ज्ञ डॉक्टरच करू शकतात. अशा प्रकारच्या प्रसूती करण्यासाठी प्रशिक्षण घेतले जाते. त्यामुळे माता आणि नवजात बाळ सुरक्षित राहतात, असेही डॉक्टरांनी सांगितले.