पुणे : बहुजननामा ऑनलाईन – इंधन दरवाढ, पशुखाद्याच्या वाढलेल्या किंमती अन् दूध उत्पादनात झालेली घट या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज दूध) गायीच्या दूध खरेदी दरात रविवारपासून (दि.21) प्रतिलिटरला 1 रुपयाने पुन्हा वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघाचे चेअरमन विष्णू हिंगे यांनी दिली. आता 29 रुपये प्रतिलिटरने दूध खरेदी होणार असून, दुधाच्या विक्री दरात कोणतीही वाढ केली नसल्याचे ते म्हणाले.
दुध उत्पादक शेतक-यांना गेल्या महिनाभरातील ही तिसरी दरवाढ मिळाली आहे. हिंगे म्हणाले की, गायीच्या 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रतिच्या दुधामध्ये यापूर्वी 21 जानेवारीपासून प्रतिलिटर 1 रुपया आणि 11 फेब्रुवारीपासून प्रतिलिटर 1 रुपया दरवाढ यापूर्वीच दिलेली असून, आता तिसर्यांदा एक रुपयाने दरवाढ दिली आहे.
गायीच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटरला वरकड खर्चासह संस्थांसाठी 29 रुपये 70 पैसे राहील. संघाचे रोजचे दूध संकलन सव्वादोन लाख लिटरइतके होत आहे. संघाच्या संचालकांबरोबर चर्चा करून हा निर्णय घेतला असून संचालक मंडळाच्या सभेत या निर्णयास कार्योत्तर मंजुरी घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.