बहुजननामा ऑनलाईन टीम – साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या (Rayat Shikshan Sanstha) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी म्हणून देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी (दि. 9) संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार (President of Rayat Shikshan Sanstha- Sharad Pawar) यांनी जमा केलेल्या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे सुपूर्द केला.
कोरोना या जागतिक महामारीने ओढवलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या मदतीच्या आवाहनानुसार सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी म्हणून देण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व कर्मचाऱ्यांच्या एक दिवसीय वेतनाची जमा रक्कम रुपये 2 कोटी 75 लाख 92 हजार 821 रुपये इतकी संस्थेचे अध्यक्ष या नात्याने खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज सुपूर्द केली. त्यावेळी दिवाळीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. कोरोना कालावधीत विविध संस्था, संघटना आणि नागरिकांनीही राज्य सरकारला व केंद्र सरकारला सहायता निधी दिला आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभा केलेल्या या शैक्षणिक क्षेत्रातील बिजाचा आज वटवृक्ष बनला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना कालवधीतील आपली जबाबदारी ओळखून राज्य सरकारला रयतच्या माध्यमातून मदत केली. शरद पवार यांनी आज मुख्यमंत्र्यांना हा धनादेश दिला. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहले आहे. या पत्रावर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठीची मदत देत असल्याचे म्हटले आहे.