पुणे : बहुजननामा ऑनलाईन – माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्हाटे याला फरार घोषित केल्यानंतर आता न्यायालयाने त्याच्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश दिले असून आज बर्हाटे यांची मालमत्ता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जप्त करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हवेली तहसीलदार व पुणे शहर तहसिलदार हे आज सकाळी १० ते १२ वाजण्याच्या दरम्यान जप्तीची ही कारवाई करणार आहेत.
त्यात कोंढवा येथील लुल्लानगरमधील मधुसुधा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट धनकवडी येथील तळजाई पठारमधील सरगम सोसायटीतील एक मोकळा प्लॉट, तसेच याच सरगम सोसायटीमधील एका प्लॉटवरील बंगला आणि कात्रज भागातील भागीदारीमधील जमीन अशा ५ मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे.
बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांना धमकावुन खंडणी वसुल केल्याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात रवींद्र लक्ष्मण बर्हाटे, दिप्ती आहेर, शैलेश जगताप, देवेंद्र जैन व अमोल चव्हाण यांच्याविरुद्ध गेल्या वर्षी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ८ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणानंतर बर्हाटे व त्याच्या टोळीविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यात जमीन व्यवहारावरुन फसवणूक करणे, खंडणी मागणे, पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावणे अशा विविध कलमाखाली अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, यातील प्रमुख सुत्रधार रवींद्र बर्हाटे हा पोलिसांच्या हाती लागू शकला नाही. त्यामुळे त्याला न्यायालयाने फरारी घोषित करुन मालमत्ता सीआरपीसी ८३ प्रमाणे जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. त्याची अंमलबजावणी आज होणार आहे.