पुणे : बहुजननामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूकीत रिपब्लीकन पक्ष युतीसोबत असेल. रिपब्लीकन पक्षाला राज्यात १० जागा हव्या आहेत. आम्ही कमळासोबत असलो तरी कमळ या चिन्हावर निवडणूक लढणार नाही. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
रविवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते.
काय म्हणाले रामदास आठवले ?
आम्हालाही मुख्यमंत्री पद द्या
मी तीन वेळा निवडून आलो आहे. त्यावेळी कधीही कॉंग्रेस पक्षाचे चिन्ह घेतले नाही. आम्ही कमळासोबत असलो तरी कमळासोबत लढणार नाही. आमचे उमेदवार कोणत्याही चिन्हावर निवडून येऊ शकतात. पक्षाला सत्तेचा वाटा चांगला मिळत आहे. कमळासोबत असलो तरी कमळ या चिन्हावर लढणार नाही. भाजप शिवसेनेने २-२ वर्षे मुख्यमंत्री पद घेऊन एक आम्हाला द्यावे.
रिपाइंला १० जागांची मागणी
राज्यात मागील विधानसभा निवडणूकीत रिपाइंला ८ जागा मिळाल्या होत्या. यावेळी महायुतीतील मित्रपक्षांसाठी एकूण १८ जागा सोडणार आहेत. आमचा पक्ष मोठा असल्याने १० जागांची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दहा जागांपैकी पुण्यातील एक आणि जिल्ह्यातील १ जागेसाठी आम्ही आग्रही आहोत. जिल्ह्यात आमच्या पक्षाची महत्त्वाची भुमीका राहिलेली आहे. कोणती जागा मागायची याचा निर्मय़ नंतर घेतला जाईल. महादेव जानकर, सदाभाऊ खोत व इतर मित्रपक्षांना उर्वरित जागा द्याव्यात. असे ते म्हणाले.
व्हिजेएनटीच्या १० टक्के आरक्षणासाठी प्रयत्नशील
देशात एससी, एसटीपेक्षाही व्हिजेएनटीची गंभीर स्थिती आहे. देशात सध्या ६० टक्के आरक्षण आहे. त्यात व्हिजेएनटीला ८ ते १० टक्के आरक्षण देण्याबाबत गांभीर्याने विचार सुरु आहे. स्वतंत्र आरक्षण दिल्यास ओबीसीवरही अन्याय होणार नाही. त्यांनाही लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण मिळायला हवे. मुस्लीम समाजालाही ८ ते १० टक्के आरक्षण मिळायला हवे. असे आठवले म्हणाले.