नरेंद्र मोदींना स्वत:ची पाठ थोपटण्याची हौस : खा.राजू शेट्टी
कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र व गोव्यातील बुथ प्रतिनिधींसमोर भाषण करताना २०१६-१७ मध्ये कारखान्यांना ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना ९९ टक्के पैसे दिल्याचे म्हटले आहे. मात्र कायद्याने १४ दिवसांच्या आत एफआरपी देणे बंधनकारक असताना चालू हंगामात ऊस उत्पादकांना वाऱ्यावर सोडले आहे. यावरून पंतप्रधान मोदी खोटे बोलण्यात वस्ताद असल्याचे दिसून येते. त्यांना स्वत:ची पाठ थोपटून घेण्याची हौस आहे, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र व गोवा राज्यांत बुध प्रतिनिधींसमोर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. यामध्ये मोदी यांनी सन २०१६-१७ सालामधील ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना ९९ टक्के बिले दिल्याचे सांगितले आहे. यावर खासदार राजू शेट्टी यांनी हल्ला चढवत शेतकऱ्यांना काय दिले आहे, हे देशाला माहीत आहे, असे म्हणत नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर देत शेट्टी म्हणाले, ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांच्या आत कायद्यानुसार केंद्र सरकारने बांधून दिलेली एफआरपी देणे बंधनकारक आहे.
सन २०१७-१८ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऊस पुरवला आहे, त्यांची थकबाकी किती आहे, त्याची तुम्हाला कल्पना आहे का, आणि ती जर तुम्हाला माहीत नसेल तर त्याची आकडेवारी मी देतो, असे सांगून शेट्टी पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशमधील २ हजार कोटी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे ३ हजार ५०० कोटी आणि गुजरातमधील शेतकऱ्यांचे गेल्या तीन वर्षांपासून पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे हे सरकार काय करतेय, या प्रश्नाचे उत्तर मला द्यावे.
Comments are closed.