नांदेड : बहुजननामा ऑनलाइन – नांदेडमधील मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा कट्टर समर्थक असलेल्या संभाजी जाधव यांनी आत्महत्या केली आहे. जाधव हे राज ठाकरेंनी मनसे स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबत होते. विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून संभाजी जाधव यांनी नांदेडमध्ये चांगलं काम केलं होतं.
व्यवसायाने शेतकरी असलेल्या संभाजी जाधव यांच्या शेतीवरील कर्ज वाढलं होतं. त्या नैराश्यातून 46 वर्षीय संभाजींनी आपले जीवन संपवून घेतले. संभाजी जाधव हे नांदेडजवळच्या डौर गावचे रहिवासी होते. याच गावात त्यांची वडिलोपार्जित जमीन होती. ते स्वतः नांदेड शहरातील तरोडा नाका भागात राहत असत. याच घरात मध्यरात्री त्यांनी गळफास घेत जीवन संपवलं. गेल्या चार वर्षांपासून कायम दुष्काळी स्थिती असल्याने शेतीचं कर्ज वाढलं होतं. त्यातून हतबल झाल्याने संभाजी जाधव यांनी जीवन संपवल्याचे सांगण्यात येत आहे.
राज ठाकरेंसोबत जाणारे संभाजी जाधव हे मराठवाड्यातील पहिले पदाधिकारी होते. त्यामुळे राज ठाकरे यांचे स्वतः संभाजी जाधव यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. संभाजी जाधव पदावर असो अथवा नसो राज ठाकरे नांदेडला आले की संभाजी जाधव यांची भेट ठरलेली असे. कर्जाच्या जाचामुळे केलेल्या आत्महत्येमुळे नांदेडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.