Raj Thackeray On Ladki Bahin Yojana | ‘…तर जानेवारीत कर्मचाऱ्यांचे पगार देणेही मुश्किल’, लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचा इशारा

अमरावती : Raj Thackeray On Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यभर चर्चा सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात. मात्र या योजनेवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.

राज ठाकरे यांनी अमरावती येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर शासनाकडे सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारीत पगार द्यायलाही पैसे राहणार नाहीत. तिजोरी रिकामी होईल, असं राज ठाकरे यांनी म्हंटले.

राज ठाकरे म्हणाले, “समाजातील कोणताही घटक फुकटात काहीही मागत नाही. सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना असेल तर परिणाम वाईट होतो. राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं आहे. महिलांना अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणा, त्यांना रोजगार देऊन सक्षम केलं पाहिजे”, असं म्हणत राज ठाकरेंनी योजनेवर अप्रत्यक्ष टीका केली.

पुढे बोलताना ते म्हणाले, “लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर शासनाकडे सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारीत पगार द्यायलाही पैसे राहणार नाहीत. तिजोरी रिकामी होईल.”