Raj Thackeray On Badlapur School Girl Incident | बदलापूर प्रकरणात राज ठाकरेंचा संताप; म्हणाले – “एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं आणि दुसरीकडे…”

बदलापूर: Raj Thackeray On Badlapur School Girl Incident | बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर आज नागरिकांचा उद्रेक झाला. याप्रकरणी संतप्त झालेल्या जमावाने ज्या शाळेत मुलींवर अत्याचार झाला होता, त्या शाळेची तोडफोड केली आहे. तर दुसरीकडे संतप्त जमावाने बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन करत ठिय्या मांडला आहे.

शाळेत लहानग्या मुलींसोबत घडलेल्या या संतापजनक घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पोलीस प्रशासनाला फटकारत आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या, असे आवाहन मनसे कार्यकर्त्यांना केलं आहे.

राज ठाकरे यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ” बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा?” असा सवाल विचारत राज यांनी प्रशासनाविरोधात आपला संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान ” माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयात तुमचं लक्ष असू द्या “, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे.

“बदलापूर अत्याचार प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणाचा आम्ही छडा लावणार आहोत. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.