बहुजननामा ऑनलाईन टीम – काँग्रेस आमदार आदिती सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. पंजाबमधील काँग्रेस आमदार अंगद सैनी यांच्याशी आदिती यांचा विवाह होणार असून दिल्लीत २१ नोव्हेंबरला लग्न तर २३ नोव्हेंबरला स्वागत समारंभ होणार आहे, अशी माहिती आदिती सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आदिती ह्या उत्तरप्रदेशातील रायबरेली मतदार संघातील काँग्रेस आमदार आहेत.
अंगद आणि आदिती या दोघांचे कुटुंब राजकारणात असून हे दोघेदेखील २०१७ मध्ये आमदार झाले होते. अंगद सिंग यांनी २०१७ मध्ये राजकारणात पाऊल टाकत शहीद भगत सिंग नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. यावेळी ते निवडून आले होते. तर आदिती सिंग या उत्तर प्रदेशातील सर्वात तरुण आमदारांपैकी एक आहेत. त्यांनी २०१७ मध्ये ९० हजार मतांनी रायबरेलीमधून विजय मिळवला होता. त्यांचे वडील अखिलेश कुमार सिंग पाचवेळा रायबरेलीमधून निवडणूक जिंकले आहेत.
दरम्यान, आदिती सिंग यांचे नाव काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. तेव्हा राहुल गांधी यांच्यासोबत साखरपुडा झाल्याच्या अफवांना उधाण आलं होत, मात्र राहुल आपले भाऊ असून रक्षाबंधनाला त्यांना राखी बांधत असल्याचंही आदिती सिंगने सांगितलं होतं.