औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – सातारा जिल्ह्यातील करपेवाडी येथील महाविद्यालयीन युवतीची गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेचा फुलंब्री परिसरातील सकल नाभिक समाजातर्फे निषेध करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी फुलंब्री तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन करण्यात आली.
ढेबेवाडी (ता.पाटण, जि.सातारा) येथील हद्दीत करपेवाडी येथील भाग्यश्री उर्फ सोनाली संतोष माने (१७) ही तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकत होती. २३ जानेवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ती घरून कॉलेजला जाते म्हणून निघून गेली. परंतु दुपारपर्यंत घरी आलीच नाही.. शोध घेतला असता करपेवाडी ते तळमावले पाणंद रस्त्यावरील देसाई शेत शिवारामध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेचा फुलंब्री तालुका सकल नाभिक समाजाच्या वतीने निषेध करण्यात येत असल्याचे तसेच आरोपींना फाशी देण्यात यावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अ. भा.जिवा सेना मराठवाडा उपाध्यक्ष दादासाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार प्रशांत काळे यांना दिलेल्या या निवेदनावर सुरेश बोर्डे, शरद पंडित, गणेश वखरे, गजानन बिडवे, कैलास वखरे, रावसाहेब बिडवे, गणेश बिडवे, अशोक बिडवे, सुनील बिडवे, किरण बिडवे, गणेश बिडवे, संदीप बिडवे आदींसह समाजबांधवांची उपस्थिती होती.