पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून काही जिल्ह्यात निर्बंध लागू केले आहे. पुण्यात काल एका दिवसातच १५०० च्या वर रुग्ण सापडले आहे. मात्र लॉकडाऊनपासून पुणेकरांना दिलासा दिला गेला आहे. परंतु पुणे शहर रात्री १० वाजता बंद करण्याची सूचना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. आजच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गेल्या काही दिवसांमध्ये पुणे जिल्हयात आणि राज्यांत रुग्णसंख्या वाढते आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात लॉकडाऊन होणार का? असा नेमका प्रश्न पुणेकरांच्या मनात होता. परंतु अजित पवार यांनी या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय बाजूला ठेवत त्यांनी पुणे शहरात अंशतः निर्बंध लागू केले आहेत. तर यामध्ये शाळा आणि कॉलेज ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. तसेच शहरातील उद्याने संध्याकाळी बंद राहणार आहे. लग्न समारंभ, धार्मिक सोहळे इतर कार्यक्रमांना ५० टक्केच उपस्थिती बंधनकारक असणार आहे. शहरातील मॉल आणि चित्रपटगृहे रात्री १० पर्यंतच सुरू ठेवण्यात येणार आहे. बाजारपेठा, दुकाने यांना रात्री १० पर्यंतच खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे. आणि रेस्टॉरंटमध्ये फक्त ५० टक्के उपस्थितीच ठेवण्याची सूचना देखील दिली आहे.
तसेच लवकरच शहरातील निर्बंधांबाबतची नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. या बैठकीला वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, महापौर हे उपस्थित होते. या बैठकीत शहरातील सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेत निर्णय घेतल्याची माहिती आहे.