Pune Traffic Jam | …तर वाहतूक कोंडी होणारच ! विकास आराखड्यातील 1 हजार 384 कि.मी. रस्त्यांपैकी केवळ 425 कि.मी. रस्त्यांचाच पूर्णत: विकास

पुणे : Pune Traffic Jam | संथ रस्ते वाहतुकीमध्ये संपुर्ण जगामध्ये चवथ्या स्थानावर आणि देशात तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या पुण्यातील रस्त्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल ५१८ चौ. कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या पुणे महापालिकेच्या हद्दीतील विकास आराखड्यातील एक हजार ३८४ कि.मी. लांबीच्या रस्त्यांपैकी केवळ ४२५ कि.मी.रस्त्यांचाच विकास आराखड्यानुसार पूर्ण विकास झाला आहे. त्यामुळे आहे त्या रस्त्यांवर लोकसंख्या आणि वाहनांच्या भरमसाठ वाढीमुळे ‘वाहतुकीचा’ बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. शहर विकासाचे श्रेय घेणारे राजकिय पक्ष या समस्येची दखल घेउन ७० लाख पुणेकरांना दिलासा देणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

    मागील काही दशकांत पुणे शहराची लोकसंख्या आणि शहराचा विस्तार झपाट्याने झाला आहे. आजमितीला एकट्या पुणे महापालिकेची हद्द ५१८ चौ.कि.मी. पर्यंत पोहोचली असून लोकसंख्या वेगाने एक कोटीकडे झेपावत आहे. त्यातुलनेत सार्वजनिक वाहतूकीत सुधारणा न झाल्याने खाजगी वाहनांची संख्या पन्नास लाखांच्या पुढे पोहोचली आहे. औद्योगीक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जागतिक बाजार पेठेचे ठिकाण असल्याने बाहेरून येणार्‍या वाहनांचे प्रमाणही प्रचंड आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर संथ वाहतूक, वाहतुकीची कोंडी, रस्त्यांवरील प्राणांतिक अपघात यामध्ये मागील अनेक वर्ष पुणे नेहमीच देशच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखिल आघाडीवर राहीले आहे. किंबहुना येथील पायाभूत सुविधा प्रामुख्याने वाहतूक कोंडीमुळे अनेक उद्योगांनी येथून काढता पाय देखिल घेतला आहे. यानंतरही हमखास उदरनिर्वाहाची गॅरंटी असल्याने मानवी लोंढे शहरावर आदळत आहेत.


   गावे समाविष्ट झाल्यानंतर शहरात २ हजार ४४ कि.मी. रस्त्यांचे जाळे पसरलेले आहे. यापैकी जुन्या हद्दीतील आणि १९९७ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ३७ गावांच्या विकास आराखड्यात एक हजार ३८४ कि.मी. रस्त्यांची आखणी करण्यात आली आहे. परंतू आराखड्यात दर्शविलेल्या या रस्त्यांपैकी केवळ ४२५ कि.मी.चे रस्ते आराखड्याप्रमाणे विकसित झाले असल्याची माहिती पथ विभागाने दिली. तर ४५९ कि.मी. लांबीचे रस्ते हे मिसिंग लिंकमुळे अविकसित राहीले आहेत. तर उर्वरीत ५०० कि.मी.च्या रस्त्यांचा पुर्णत: विकासच झालेला नाही. या पुर्णपणे विकसित न झालेल्या रस्त्यांच्या कडेला पदपथ, पार्किंग आणि व्यावसायीकांची अतिक्रमण यामुळे हे रस्ते अधिकच आक्रसलेले आहेत. याचा परिणाम वाहतुकीच्या गतीवर होत आहे, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

शहरातील रुंदीनिहाय रस्ते

  • एकूण रस्त्यांची लांबी – २०४४ कि.मी.
  • ६ मीटर रुंदीपर्यंतचे रस्ते – ४१२ कि.मी.
  • ९ ते १२ मीटर रुंदीचे रस्ते – ३२८ कि.मी.
  • १२ ते २४ मीटर रुंदीचे रस्ते – ३३९ कि.मी.
  • २४ ते ३० मीटर रुंदीचे रस्ते – ७२ कि.मी.
  • ३० ते ३६ मीटर रुंदीचे रस्ते – ३२ कि.मी.

*विकास आराखड्या प्रमाणे रस्त्यांची लांबी – १,३८४ कि.मी.

  • पूर्ण रुंदीने विकसित झालेले रस्ते – ४२५ कि.मी.
  • रस्ता रूंदीकरण न झालेले रस्ते – ५०० कि.मी.
  • मिसिंग लिंकमुळे अविकसित रस्ते – ४५९ कि.मी.
  • सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते – ४०० कि.मी.
  • इतर रस्ते लांबी – ४४ कि.मी.

रस्ता रुंदीकरणातील अडचणी

  • जुन्या शहरात पुर्वीच्या रस्त्यांच्या कडेला असलेल्या इमारतींचा पुर्नविकास होत नाही तोपर्यंत त्या रस्त्यांचा पुर्णत: विकास करणे अशक्य.
  • भूसंपादनासाठी रोखीने मोबदला मागितला जात असल्याने तो देण्यासाठी पुरेश्या निधीचा अभाव.
  • विकास आराखड्यातील रस्ता रुंदीनुसार रस्ता रुंदीकरण झाले नसले तरी बांधकामांना परवानगी दिली जात असल्याने सुरू असलेला अनियोजीत विकास.
  • भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठीची किचकट आणि वेळखाउ तांत्रिक प्रक्रिया यामुळे विकास आराखड्याची धिम्या गतीने अंमलबजावणी.