पुणे : बहुजननामा ऑनलाईन – प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीच्या वडिलावर कोयत्याने सपासप वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुण त्याच्या मित्रांना घेऊन तरुणीच्या घरासमोर जात गोंधळ घालत होता. त्यावेळी वडिलांनी त्यांना विरोध केला. यावरून त्यांच्यावर वार केले आहेत. वानवडी भागात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सौरभ अडागळे, सागर अडागळे, ओम भोसले आणि रोहित भोसले यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मुलीच्या 40 वर्षीय वडिलांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ अडागळे याचे फिर्यादी यांच्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने मुलीला प्रेमाची मागणी घातली. मात्र, मुलीने त्याला नकार दिला. याचा राग सौरभच्या मनात होता. त्याने इतर तीन मित्र सोबत घेतले आणि काल फिर्यादी यांच्या घरासमोर जात त्यांच्या मुलीची नाव घेऊन आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
फिर्यादी यावेळी बाहेर आले आणि त्यांनी या आरोपींना समजण्याचा प्रयत्न केला. पण, आरोपीनी त्यांना शिवीगाळ करत “तुझा मर्डर करतो” अशी धमकी देऊन निघून गेले. दरम्यान या सर्व प्रकारानंतर फिर्यादी हे घाबरले होते. तरीही ते पोलीसाकडे तक्रार देण्यास निघाले. पण मध्येच आरोपी सौरभ व त्याच्या मित्रांनी अडविले. तर फिर्यादी यांना शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यात व डाव्या खांद्यावर कोयत्याने वार केले. यावेळी मध्ये आलेल्या फिर्यादीच्या दोन्ही मुलींनाही मारहाण केली आहे. त्यानंतर हातातील कोयता हवेत फिरून परिसरात आरोपींनी दहशत निर्माण केली. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.