पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपयायोजना आखल्या जात आहेत. कोरोनाच्या रुग्ण संख्येत वेगाने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सुधारीत आदेश जारी केले आहेत.
पुणे महापालिकेचे सुधारीत नियम
1. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये यांचे नियमित वर्ग 30 एप्रिल 2021 पर्यंत बंद राहतील. मात्र, ऑनलाइन शिक्षणास परवानगी असेल. तसेच इयत्ता 10 वी व 12 वी च्या परीक्षा असल्याने यामधून त्यांना वगळण्यात आले आहे.
2. सर्व कोचिंग क्लासेस (MPSC,UPSC वगळून) 30 एप्रिल 2021 पर्यंत बंद राहतील. MPSC,UPSC कोचिंग क्लासेस मध्ये 50 टक्के उपस्थिती राहील. मार्गदर्शक सूचना व अटींचे पालन करावे.
3. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील लग्न समारंभाला जास्तीत जास्त 50 लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी.
खालील सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल
– नागरिकांना विना मास्क प्रवेश देऊ नये
– प्रवेशद्वारावर Thermometer, Thermal Scanner/Gun, Pulse Oxymeter द्वारे तपासणी करावी.
– कोविड-19 ची लक्षणे नसलेल्या नागरिकांना प्रवेश द्यावा. ताप, सर्दी, खोकला यासारखी लक्षणे असल्यास प्रवेश देऊ नये.
– अस्थापना चालकांनी नागरिकांना हॅन्ड सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे.
– नागरिकांकडून मास्कचा वापर व सामाजिक अंतर पाळणे या नियमांचे काटेकोर पालन होते का हे संबंधितांनी पहावे. तसेच यासाठी कर्मचारी नियुक्त करावेत.
– नियमांचा भंग झाल्यास केंद्र शासन कोविड-19 आपत्ती संपूर्णपणे संपली असे जाहीर करत नाही, तोपर्यंत संबंधित अस्थापना बंद करण्यात येईल. तसेच मालकाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल.
4. अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थित करण्यास परवानगी असले.
5. पुणे महापालिका क्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमास बंदी राहील. याच अनुषंगाने भूमी पूजन, उद्घाटन असे मोठ्या गर्दीच्या कार्यक्रमास 1 एप्रिल 2021 पासून प्रतिबंध राहील.
6. पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण/सेवा वगळता 1 एप्रिल 2021 पासून रात्री 11 ते सकाळी 6 यावेळेत बाहेर फिरण्यास सक्त मनाई असले. मात्र, यामधून जिवनावश्यक वस्तू (दुध, भाजीपाला, फळे) पुरवठा करणारे, वृत्त सेवा व अत्यावश्यक सेवा पुरवणारे आस्थापना, व्यक्ती व त्यांच्या वाहनांना वगळण्यात येत आहे. तसेच ज्या उद्योगांचे शिफ्टमध्ये काम चालते अशा संबंधित अस्थापनेत काम करणाऱ्यांना ने-आण करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे.
7. या मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
कोविड -19 च्या प्रतिबंधासाठी जारी केलेले आदेश, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.