पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाबाधितांच्या विलगीकरणासाठी विश्रांतवाडी येथील संत ज्ञानेश्वर वसतीगृहामध्ये सुरू करण्यात आलेले कोव्हीड सेंटरमधील रुग्णसंख्या अत्यल्प असल्याने हे सेंटर बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी येरवडा येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोव्हीड केअर सेंटरमध्ये रुग्णांना प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.
शहरातील अॅक्टीव्ह कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. आजमितीला ही संख्या १० हजारांपर्यंत कमी झाली असून बहुतांश रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. महापालिकेने सुरू केलेल्या कोविड सेंटरमधील रुग्णसंख्याही बर्यापैकी कमी झाली आहे. त्यामुळे व्यवस्थापनाच्या दृष्टीने सुलभता यावी यासाठी कोविड सेंटरचे फेरनियोजन करण्यात येत आहे. सध्या महापालिकेची चार कोविड सेंटर असून याठिकाणी २ हजार १०० बेडस्ची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी जेमतेम ६०० च्या आसपास रुग्ण आहेत. विश्रांतवाडी येथील संत ज्ञानेश्वर वसतीगृहातील सेंटरमध्ये सध्या फक्त ४७ रुग्ण आहेत.
नुकतेच येथून जवळच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून याठिकाणी कोरोना बाधित लहान मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी स्वंतत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तिसर्या लाटेमध्ये लहान मुलांमधील कोरोनाचे प्रमाण वाढण्याची शक्यता गृहीत धरून हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. तूर्तास संत ज्ञानेश्वर वसतीगृहातील नवीन प्रवेश बंद करून डॉ. आंबेडकर कोविड सेंटरमध्ये रुग्णांना प्रवेश देण्यात येईल. वसतीगृहातील सेंटरवरील कर्मचारी देखिल नवीन सेंटरकडे वर्ग करण्यात येतील, अशी माहिती रुबल अग्रवाल यांनी दिली. रुग्णसंख्या कमी झाल्याने काही सेंटर्स बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी संभाव्य तिसर्या लाटेचा विचार करून सर्व सेंटर्समधील यंत्रणा आहे तशीच ठेवणार असल्याचेही अग्रवाल यांनी नमूद केले.