पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरात दणक्यात कारवाई करत असलेल्या गुन्हे शाखेत सर्वच काही आलबेल नसल्याचे समोर आले असून गेल्या आठवड्यात युनिट-4 च्या पथकाने चतुःश्रृंगी परिसरात बेकायदेशीर रॅमिडेसिवीर विक्री केल्या प्रकरणात कारवाई केल्यानंतर ‘त्या’ आरोपींच्या नातेवाईकांबरोबर एक पोलिस उपनिरीक्षक पार्टीला गेल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे त्याठिकाणी मुलींची छेडछाड काढल्याची तक्रार संबंधितांकडून करण्यात आली आहे. आता या तक्रारीवरून संबंधित उपनिरीक्षकास निलंबित करण्यात आले आहे. यामुळे गुन्हे शाखेसह शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
उपनिरीक्षक दीपक माने असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्याकडे संबंधितांकडून तक्रार आली होती. या तक्रारीवरून पोलिस उपनिरीक्षकास निलंबित केल्याची खात्रीशीर माहिती आहे. याबाबत उपायुक्त घाडगे यांना विचारले असता ‘मी मीटिंगमध्ये आहे, नंतर बोलतो’ असे म्हणत त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ करून फोन बंद केला.
सूत्रांच्या माहितीनुसार, उपनिरीक्षक दीपक माने हे युनिट-4 येथे नेमणुकीस आहेत. गेल्या आठवड्यात (दि. 17) चतुःश्रृंगी परिसरात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेकायदेशीर रॅमिडेसिवीर इंजेक्शन विक्री करण्यास आलेल्या दोन सख्या भावांना अटक केली होती. त्यांच्याकडून दोन इंजेक्शन जप्त केले होते. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर उपनिरीक्षक माने यांची यातील आरोपींच्या नातेवाईक असलेल्या व्यक्तीशी ओळख झाली. ओळखीनंतर त्या व्यक्तींने त्यांना पार्टीसाठी आमंत्रित केले.
माने देखील पार्टीसाठी गेले. यावेळी त्यांनी मद्यपान केले. मद्यपान केल्यानंतर माने यांनी मुलींची छेडछाड काढली, अशी तक्रार केली. त्या मुली अल्पवयीन असल्याची माहिती आहे. त्यानंतर या मुलींच्या नातेवाईकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानुसार तात्काळ माने यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली असून, त्याचा तपास चतुःश्रृंगीच्या सहाय्यक आयुक्तांकडे देण्यात आला आहे, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार ग्रामीणच्या हद्दीत घडला आहे. या घटनेने मात्र गुन्हे शाखा आणि शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पण, याबाबत माहिती देण्यास वरिष्ठ अधिकारी टाळाटाळ करत आहेत.