पुणे : बहुजननामा ऑनलाईन – अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पण वरिष्ठांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर देखील कारवाई न करता आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षकासह 6 जणांची दोन वर्षे वेतनवाढ रोखली आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी हे आदेश दिले आहेत.
येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युनूस खान, गुन्हे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक राहूल गिरमकर, सहायक फौजदार राजू बहिरट (सध्या नेमणूक मुख्यालय), पोलीस नाईक अशोक सी. गवळी, किशोर जी. सांगळे अशी वेतनवाढ रोखण्यात आलेल्यांची नावे आहेत.
येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैद्य मटका, झुगार, दारुविक्री धंदे सुरु असतानाही वरिष्ठ निरीक्षक युनूस खान आणि गुन्हे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांचा पर्यवेक्षणाचा अभाव असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. त्याशिवाय सहायक पोलीस निरीक्षक राहूल गिरमकर यांचेही येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रभावी कर्तव्य नसल्याचे आदेशात म्हटले आहे. त्याशिवाय त्यांची हद्दीतील वसुली कर्मचारी किशोळ सांगळे करीत असल्याचे तक्रारी अर्जात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार राजू बहिरट, अशोक गवळी, किशोर सांगळे यांनी वारंवार संशयित अवैध धंदेवाल्यांशी संपर्क साधल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे चौकशीत संबंधितांची कसुरी उघडकीस आली आहे. त्यामुळे सहाजणांविरुद्ध दोन वर्ष वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक आणि निपक्षःपातीपणे काम केले पाहिजे. शासकीय कर्तव्ये निष्ठेने केली पाहिजेत. जनतेच्या मनामध्ये पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी काम करण्याचे सांगत त्यांचे कान टोचण्यात आले आहेत.