Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्‍या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)

Gold

पुणे : Pune Police Nakabandi News | निवडणुकीच्या अनुशंगाने स्थापन करण्यात आलेल्या नाकाबंदीत एका व्हॅनविषयी संशय आल्याने तिची तपासणी केली जात असता त्यात तब्बल १३८ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आढळून आले. ही व्हॅन ताब्यात घेण्यात आली असून त्याबाबत निवडणुक आयोग (EC Officer Pune) आणि प्राप्तिकर खात्याला (IT Dept) याची माहिती देण्यात आली आहे. पुढील कारवाई या दोन्ही विभागाकडून करण्यात येणार आहे. (Gold Found In Tempo At Padmavati Pune)

ज्या व्हॅनमधून हे दागिने आणण्यात आले ती ‘सिक्वेल ग्लोबल’ या कंपनीचे मुख्य कार्यालय तामिळनाडुतील कृष्णगिरी जिल्ह्यातील होसुर येथे आहे. तिच्या देशभर शाखा असून हिरे व सोन्याचे दागिने या वितरणामधील ही प्रमुख कंपनी आहे. देशांतर्गत वेगवेगळ्या शहरांमध्ये सोने, चांदी, हिरे यांचा कच्चा माल तसेच तयार दागिने यांची वाहतूक करण्यात आघाडीवरील कंपनी आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पद्मावती येथे स्थिर तपासणी नाका उभारण्यात आला. तेथे ही व्हॅन सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आली. नाकाबंदीवरील पोलिसांना संशय आल्याने त्यांनी व्हॅन थांबविली. व्हॅनच्या मागील बाजू उघडल्यावर त्यात पांढरे बॉक्स आढळून आले. त्यांनी व्हॅनच्या चालकाकडे चौकशी केली. तेव्हा त्याने त्यात सोन्याचे दागिने असल्याचे सांगितले. त्याबाबतची कागदपत्रेही त्यांच्याकडे होती. त्याची किंमत पाहिल्यावर नाकाबंदीवरील पोलिसांनी ही बाब वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना सांगितले. त्या पाठोपाठ निवडणुक आयोगाचे अधिकारी, प्राप्तिकर खात्याचे अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी ही व्हॅन सहायक पोलीस आयुक्ताच्या कार्यालयात आणली.

याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (Smartana Patil IPS) यांनी सागिंतले की, नाकाबंदीवरील पोलिसांना संशय आल्याने ही व्हॅन थांबविण्यात आली. आत पाहिले असता पांढर्‍या पोत्यांमध्ये बॉक्स भरलेले दिसून आले. याबाबत चौकशी केल्यावर त्यांनी त्यात सोन्याचे दागिने असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे असलेल्या पावत्यांनुसार त्यात १३८ कोटी रुपयांचे दागिने असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी संशय असलेला हा माल पकडून प्राप्तिकर अधिकारी व निवडणुक आयोगाच्या अधिकार्‍यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ती पांढरी पोती सीलबंद असून त्यात आणखी काही आहे का याची पोलिसांनी तपासणी केलेली नाही. प्राप्तिकर अधिकारी व निवडणुक अधिकारी पुढील कारवाई करतील, असे र्स्मातना पाटील यांनी सांगितले.

मुंबईहून हे दागिने पुण्याला घेऊन येत असल्याचे सांगण्यात आले. मुंबईहून येताना पूर्ण पुणे शहराला वळसा मारुन तो चालक कात्रज मार्गे येण्याचे कारण काय. तसेच हे एका सराफाचे की अनेक सराफांचे सोन्याचे दागिने आहेत, याची माहिती मिळू शकली नाही.