पुणे : बहुजननामा ऑनलाईन- कोरोना महामारीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा देणारी दस मे बस अशी योजना पालिकेतील सत्ताधारी पक्षाने प्रस्तावित केली आहे. ‘मध्यवर्ती भागात दहा रुपयांत पीएमपीचा वातानुकूलित प्रवास’ अशी ही योजना असून, यासाठी ५० मिडी गाडय़ा खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या बसेस पीएमपीच्या चाकण येथील कार्यशाळेत दाखल झाल्या आहेत. अनलॉकनंतर पुणेकरांच्या सेवेत या बसेस धावण्याची शक्यता आहे.
पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी हा उपक्रम असून, शहराच्या मध्यवर्ती भागात अवघ्या दहा रुपयांमध्ये पीएमपीचा दिवसभर प्रवास करता यावा, अशी योजना स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासणे यांनी अंदाजपत्रकात मांडली होती. त्या दृष्टीने फेब्रुवारी महिन्यात महापालिकेच्या स्थायी समितीने ५० मध्यम आकाराच्या (मिडी बस) गाडय़ा खरेदी करण्यास मान्यता दिली होती. पीएमपीकडून ही प्रक्रिया राबविली असून ५० बसेस दाखल झाल्या आहेत. या सर्व बसेस वातानुकूलित आहेत. या बसेसची पाहणी केली असून, येत्या काही दिवसांत ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रासणे म्हणाले की, मध्यवर्ती भागातील अरुंद रस्ते, दाट लोकवस्तीचा भाग असल्याने ही योजना हाती घेण्यात आली आहे. दहा रुपयांमध्ये दिवसभर काही मार्गावर प्रवाशांना दिवसभर प्रवास करता येणार आहे. डेक्कन ते पूलगेट, स्वारगेट ते पुणे रेल्वे स्थानक, स्वारगेट ते शिवाजीनगर आणि स्वारगेट- पुणे रेल्वे स्थानक मार्गे पूलगेट ( मार्गे टिळक रस्ता- खजिना विहीर-अप्पा बळवंत चौक) असे मार्ग योजनेसाठी निश्चित करण्यात आले आहेत. टप्प्याटप्प्याने योजनेचा विस्तार शहराच्या सर्व विभागात करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी येत्या काही महिन्यात २५० ते ३०० मध्यम आकाराच्या गाडय़ांची खरेदी करण्यात येणार आहे. २६ लाख ९५ हजार रुपयांना एक गाडी याप्रमाणे ५० गाडय़ांसाठी एकू ण १३ कोटी ४० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. शहरातील लोकसंख्येचा विचार करता साडेतीन हजार गाडय़ांची आवश्यकता आहे. पेठांमध्ये खासगी वाहने कमीत कमी संख्येने यावीत आणि वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाच रुपयांत पाच किमी प्रवासाला प्रतिसाद
पीएमपीच्या अटल बस सेवेअंतर्गत पाच रुपयांमध्ये पाच किलोमीटर अंतरापर्यंतचा प्रवास ही योजना सुरू करण्यात आली आहे. सध्या करोना संसर्गामुळे सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली असली, तरी योजनेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळला आहे. पुणे रेल्वे स्थानक, स्वारगेट, शिवाजीनगर, महापालिका मुख्य भवन, पूलगेट अशा महत्त्वाच्या स्थानकांवरून सरासरी तीन ते सहा किलोमीटर अंतरावरील ९ मार्गावर ही सेवा देण्यात येत होती. या योजनेचीही व्याप्तीही वाढविण्यात येत असून अनेक नवे मार्ग सुरू करण्याचे प्रस्ताव पीएमपी प्रशासनाकडे देण्यात आले होते. मात्र, कोरोना महामारीमुळे पीएमपी बससेवा बंद ठेवली आहे.
बसची आकर्षक रंगसंगती
दस मे बस योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या बसेसची रंगसंगती आकर्षक असून, गुलाबी रंगाच्या आहेत. नैसर्गिक इंधनावर त्या धावणार आहेत. पीएमपीकडून या गाडय़ांची चाचणी केली जाणार असून चाचणी प्रक्रिया आणि आवश्यक परवानगीनंतर गाडय़ांचे उद्घाटन करण्याचे नियोजित आहे.