Pune PMC News | निर्णय प्रक्रिया गतीमान करण्यासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्तांकडील खात्यांच्या पदभारात बदल
पुणे – Pune PMC News | महापालिकेतील (Pune Municipal Corporation – PMC) अतिरीक्त आयुक्त पदाच्या अधिकारात बदल करण्याचे आदेश आयुक्त राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांनी जारी केले आहे. अतिरीक्त आयुक्त पदाच्या दोन जागा रिक्त असतानाच हा आदेश काढल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र, लवकरच नवीन दोन अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती होणार असून प्रकल्प आणि दैनंदीन कामांमध्ये सुसूत्रता आणून त्यांना निर्णयप्रक्रिया गतीमान करण्यासाठी आणखीही काही बदल करण्यात येत असल्याची माहिती देत महापालिका आयुक्तांनी या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.
महापालिकेत अतिरीक्त आयुक्त ( जनरल ), अतिरीक्त आयुक्त ( इस्टेट ) आणि अतिरीक्त आयुक्त (विशेष ) अशी तीन पदे आहे. या तीन पदापैकी अतिरिक्त आयुक्त ( इस्टेट ) या पदावर पृथ्वीराज बी. पी. हे कार्यरत आहे. अतिरीक्त आयुक्त ( जनरल ) आणि ( विशेष ) ही दोन्ही पदे सध्या रिक्त आहेत. गेल्या महीन्यात अतिरीक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांची बदली झाली आहे, तर लोकसभा निवडणुकीपुर्वी विकास ढाकणे यांची बदली झाली होती. ही दोन्ही पदे सध्या रिक्त आहेत. महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाच्या सुसुत्रतेसाठी या अतिरीक्त आयुक्तांकडे विविध विभागांची जबाबदारी असते. त्यानुसार त्यांच्याकडे आर्थिक मर्यादेेच्या ठरावाचे अधिकार असतात. दोन पदे रिक्त असल्याने यापैकी काही विभागाचा चार्ज हा पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे दिला गेला होता. आता त्यांच्याकडे एसआरए ( झोपडपट्टी पुनर्विकास योजना ) आणि जायका प्रकल्पाची जबाबदारी सोपविली गेली आहे. तर पुर्वी बिनवडे यांच्याकडे असलेल्या बांधकाम विभागातील केवळ नोटीसेस देण्याचा अधिकार पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे ठेवला आहे. परंतू या आदेशाची उलट सुलट चर्चा अधिकारी वर्तुळात सुरू होती.
यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, सध्या एकच अतिरिक्त आयुक्त आहेत. लवकरच दोन अतिरिक्त आयुक्तांच्या जागांवर नियुक्त्या होणार आहेत. महापालिकेच्या माध्यमांतून सध्या ड्रेनेज, नदी सुधार, पाणी पुरवठयाचे दिर्घकालिन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत प्रकल्पांची कामे एका अतिरिक्त आयुक्ताकडे तर याच विभागाची दैनंदीन कामे मात्र दुसर्या अतिरिक्त आयुक्तांकडे होती. शासनही बांधकाम परवानगीतील काही टप्पे काढून ही प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेतील निर्णय प्रक्रिया गतीमान व्हावी यासाठी नियोजनाचा भाग म्हणून अतिरिक्त आयुक्तांच्या खात्यांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
अतिक्रमण कारवाईसाठी ‘फ्लाईंग स्न्वाड’
अतिक्रमण रोखण्यासाठी स्वतंत्र फ्लाईंग स्न्वाड तयार करण्यात येणार आहे. या फ्लाईंग स्न्वाडला संपुर्ण शहरात अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मुभा असेल. या स्न्वाडने एखाद्या झोनमधील अतिक्रमण हटविल्यास संबधित झोनमधील अधिकार्यांना अतिक्रमण का झाले? याची विचारणा केली जाणार आहे. या स्न्वाडच्या माध्यमांतून अतिक्रमणांना आळा घालणे हा एकमेव उद्देश असेल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
Comments are closed.