Pune PMC News | देवाची उरूळी आणि फुरसुंगी गावे महापालिकेतून वगळल्यानंतर बेकायदा नळजोडांसाठी ‘हजारो’ रुपयांची उलाढाल सुरू

बेकायदा नळजोडांमुळे सर्वसामान्य नागरिकांना ‘कृत्रिम’ पाणी टंचाईची झळ
पुणे : Pune PMC News | महापालिका हद्दीतून वगळल्यानंतर देवाची उरूळी आणि फुरसुंगी या गावांतील परिस्थिती बिघडली आहे. विशेषत: बेकायदा नळ जोडासाठी हजारो रुपये उकळणार्यांचा सुळसुळाट झाला आहे. बेकायदा नळजोडांमुळे नुकतेच सुरू झालेली पाणी पुरवठा यंत्रणा कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
देवाची उरूळी आणि फुरसुंगी ही दोन गावे पुणे महापालिका हद्दीतून वगळून स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय झाला आहे. नगर परिषद स्थापनेची तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप या गावांना प्राथमिक सुविधांसाठी महापालिकेवरच अवलंबून राहावे लागत आहे. महापालिकेच्या कचरा डेपोमुळे जलस्त्रोत प्रदुषित झाल्याने महापालिका या परिसरात अद्यापही दररोज २०० टँकर पाणी पुरवठा करत आहे. तसेच स्वच्छता, सार्वजनिक प्रकाश व्यवस्था सारख्या प्राथमिक सुविधा महापालिकेच्यावतीने पुरविण्यात येत आहेत. मात्र, विकास कामे मात्र थांबविली आहेत. ही गावे महापालिकेत असतानाच महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्यावतीने येथे १५ एमएलडी क्षमतेचे जलकेंद्र उभारण्यात आले आहेत. यासाठी महापालिकेने देखिल काही प्रमाणात आर्थिक भार उचलला आहे. या जलकेंद्राला पाणी पुरवठ्याची लाईन जोडण्याचे काम अनेक अडचणींनंतर पुर्ण झाले असून हा प्रकल्प मागीलवर्षीच कार्यन्वीत झाला आहे.
देवाची उरूळी परिसरात काही ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईनचे काम करून घेण्यात आले आहे. परंतू देवाची उरूळी व फुरसुंगी परिसरातील अनेक भागात पाईपलाईनचे काम अद्याप व्हायचे आहे. सध्या ही दोन्ही गावे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात नाहीत. येथे प्रशासक नेमण्यात आला आहे. येथील कामांवर लक्ष ठेवणारी यंत्रणा अस्तित्वात नसल्याने अनेकांचे फावले आहे. काही ठिकाणी टाकलेल्या पाईपलाईनमधून बेकायदा नळजोड देण्यासाठी १५ ते २५ हजार रुपये आकारले जात आहेत. यामुळे पैसे देउन हवे तेवढे कनेक्शन घेण्यासाठी ठराविक वर्ग सरसावला आहे. रात्रीच्यावेळी बिनधास्त रस्ते खोदाई करून बेकायदा टॅप मारण्याची कामे सुरू आहेत. बेकायदा टॅपमुळे येथील पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत, अशी माहिती येथील सुजाण नागरिकांनी दिली.
बेकायदा नळजोडांमुळे पाणी गळती
बेकायदा नळजोडांमुळे पाणी पुरवठ्याचे मोजमाप करणे अवघड होते. या नळजोडांमुळे साधारण २० टक्क्यांहून अधिक पाणी गळती होते. पुणे महापालिकेने मागील काही वर्षात बेकायदा नळजोडांना चाप लावण्यासाठी अशा नळजोडांवर कारवाई देखिल केली आहे. बेकायदा नळजोडांमुळे पाणी पुरवठ्याचे नियोजनही कोलमडत असल्याने पाणी उपलब्ध असतानाही अनेकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. यासंदर्भात अनेक शहरांना आलेला अनुभव लक्षात घेता नव्याने होणार्या देवाची उरूळी फुरसुंगी नगर परिषदेच्या हद्दीमध्ये तातडीने ‘समान पाणी पुरवठा’ योजना राबविण्याची गरज असल्याचे मत जाणकार अधिकारी व्यक्त करत आहेत.
कोट
देवाची उरूळी आणि फुरसुंंगी ही गावे महापालिका हद्दीतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतू अद्यापही प्राथमिक सुविधा देण्याची जबाबदारी पुणे महापालिकेकडेच आहे. ही गावे वगळल्यानंतर नळजोड मिळावा यासाठी महापालिकेकडे एकही अर्ज आलेला नाही. बेकायदा नळजोडांबाबत नागरिकांकडून तक्रार आल्यास महापालिका कारवाई करेल.
- प्रसन्नराघव जोशी (कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग, पुणे महापालिका)
Comments are closed.