पुणे : बहुजननामा ऑनलाइन : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्यानंतर स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी कशा पद्धतीने निवडणुका लढवणार याबाबत संजय राऊत यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. आगामी पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढायची हे सूत्र ठरलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहतील. त्यात काँग्रेसला सामावून घ्यायचं, त्या बद्दल चर्चा करु, असे राऊत यांनी आज सांगितले. ते पुण्यात बोलत होते.
संजय राऊत यांनी सांगितले की, ज्या शहरामध्ये ज्या पक्षाची ताकद जास्त आहे, त्यांनी पुढाकार घ्यावा. मुंबई, कल्याण-डोंबिवली, संभाजीनगर, नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे. त्या तुलनेत इतर पक्षांची ताकद कमी असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड अशा काही शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुका एकत्र कशा लढायच्या, याबद्दल अजित पवारांबरोबर चर्चा करु, असे संजय राऊत यांनी सांगितले. एकत्र लढणं हे सत्ता परिवर्तनाच्या दिशेने असेल, असे मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.