पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | चार किलो ड्रायफ्रूट केवळ 399 रुपयात देण्याची ऑफर सोशल मीडियावर देऊन ड्रायफ्रूट खरेदी करणाऱ्या ग्राहकाची आर्थिक फसवणूक केली (Cheating Fraud Case). सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) ग्राहकाच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन एक लाख 79 हजार 400 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार खेड तालुक्यातील (Khed Taluka) महाळुगे येथे 30 मार्च रोजी रात्री एक ते दीडच्या सुमारास घडला आहे.
याप्रकरणी चंद्रकांत उत्तम गुंड (वय-41 रा. द्वारका सिटी, महाळुंगे, ता. खेड) यांनी बुधवारी (दि.5) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Mahalunge MIDC Police Station) फिर्याद दिली. समस्त टेक्नॉलॉजीस पी आर नावाच्या सोशल मीडियावरील खातेधारकाच्या विरोधात पोलिसांनी आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने समस्त टेक्नॉलॉजीस पीआर नावाचे फेसबुक पेज तयार केले. त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ते, मनुके असे प्रत्येकी एक किलो एकूण चार किलो ड्रायफ्रूट फक्त फक्त 399 रुपयात मिळेल, अशी कॉम्बो ऑफर दिली. तसेच फ्रि होम डिलिव्हरी देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांनी ती जाहिरात पाहून ड्रायफूट खरेदी करण्यासाठी पेजवर क्लिक केले. त्यानंतर पेमेंटच्या बहाण्याने गुंड यांच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेत आरोपीने त्यांच्या क्रेडिट कार्डवरून एक लाख 79 हजार 400 रुपये ट्रान्स्फर करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चंद्रकांत गुंड यांनी पोलिसांकडे धाव घेतली. गुंड यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते करीत आहेत.