Pune Pimpri Chinchwad Crime News | मोबाईल गॅलरी उघडताच त्यांचे नागरिकत्व आले पुढे ! हिंदु नाव धारण करुन राहणारे बांगला देशी पुरुष, महिला जाळ्यात

December 25, 2024

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | पोलिसांनी ते बांगला देशी नागरिक असल्याची पक्की माहिती मिळाली होती. पण, त्यांच्याकडील कागदपत्रे पाहून ते तर भारतीय नागरिक असल्याचे दिसून येत होते. शेवटी त्यांच्यातील पुरुषाकडील मोबाईल सहायक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे यांनी घेतला. मोबाईलच्या गॅलरीची पडताळणी केल्यावर त्यांना ते बांगलादेशी असल्याचा पुरावाच मिळाला. मुनीर हुसेन असे नाव असताना टिंकु चौधरी असे नाव धारण करुन पत्नीसह लॉजमध्ये मजुरी करणार्‍या बांगला देशी नागरिकांना चाकण पोलिसांनी (Chakan Police) पकडले आहे. ते बनावट आधार कार्ड व मतदार कार्ड बनवून भारतात रहात होते. (Bangladeshi Migrants Arrested)

टिंकु चौधरी ऊर्फ मोनीर हुसेन (वय ३१) खादिजा खातून (वय २४, दोन्ही रा. साईराज लॉजिंग, आळंदीफाटा, मेदनकरवाडी, मुळ रा. छालचुरा, पो. रानटिया, जिनेगती थाना जिल्हा शेरपूर, ढाका, बांगला देश) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत पोलीस हवालदार सुनिल बबन शिंदे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, सहायक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे यांनी पोलीस हवालदार सुनिल शिंदे, पोलीस अंमलदार रेवन्नाथ खेडकर, उद्धव गर्जे, उषा होले यांना मेदनकरवाडी परिसरात बांगला देशी नागरिकांची माहिती काढून कारवाई करण्यास सांगितले होते. सहायक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे यांना साईराज लॉजिंग येथे बांगला देशी पतीपत्नी कामाला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन लॉजमध्ये काम करणार्‍या कामगारांना बोलावले. तेव्हा एकाने टिंकु चोधरी असे सांगून आधार कार्ड दाखविले. महिलेने तिचे नाव खादिजा खातून असल्याचे सांगून मतदार कार्ड दाखविले. त्यांच्याकडील कागदपत्रावरुन दोघेही भारतीय वाटत होते. तेव्हा सहायक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे यांनी टिंकु चौधरी याचा मोबाईल घेऊन त्याची पडताळणी केली.

त्यात ए८८० हा बांगला देश चा कोड असलेल्या वेगवेगळ्या मोबाईल नंबरवर फोन केल्याचे दिसून येत होते. तसेच मोबाईल गॅलरीमध्ये गर्व्हमेंट ऑफ दि पिपल्स रिपब्लिक ऑफ बांगला देश या नावाने आय कार्ड मिळाले. त्यावर टिंकु चौधरी नाव सांगणार्‍याचा फोटो होता अन त्यावर मोनीर हुसेन जन्म तारीख ८ मार्च १९९४ असे होते. दुसर्‍या कार्डवर मिस खासिझा खातून, जन्म तारीख १ एप्रिल १९९३ असे होते. हे पाहिल्यावर दोघांनी आम्ही बांगला देशी नागरिक असल्याची कबुली दिली.