Pune Pimpri Chinchwad Crime News | पान टपरीतील चोरीच्या संशयावरुन तीक्ष्ण हत्याराने मारहाण करुन तरुणाचा खून

October 29, 2024

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | पान टपरीमध्ये झालेल्या चोरीच्या संशयावरुन दोघांनी तरुणाला बियर पाजण्यासाठी नेऊन तीक्ष्ण हत्याराने मारहाण करुन खुन केला (Murder Case). त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह उसाच्या शेताच्या बाजूला असलेल्या पडीक शेतात नेऊन टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी (Shirgaon Police Station) दोघांना अटक केली आहे.

अक्षय नरेंद्र सोरटे (वय २८, रा. दारुंब्रे, ता. मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, संग्राम ऊर्फ नामदेव मारोती सोरटे (वय ३२) आणि नवनाथ वाघोले (वय ३४, दोघेही रा. दारुंब्रे, ता़ मावळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत नरेंद्र किसन सोरटे (वय ५२, रा. दारुंब्रे, ता. मावळ) यांनी शिरगाव पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार दारुंब्रे येथे २७ ऑक्टोबर सायंकाळी ७ ते २८ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संग्राम सोरटे याची पान टपरी असून नवनाथ वाघोले हा त्याच्याकडे कामाला आहे. सुमारे एक महिन्यांपूर्वी सोरटे याच्या पानटपरीमध्ये चोरी झाली होती. त्याचा संशय अक्षय सोरटे याच्यावर घेतला होता. तसेच नवनाथ वाघोले याच्या आई व बहिणीला अक्षय काहीतरी बोलला होता, म्हणून त्यांच्यात किरकोळ भांडण झाले होते. याचा राग मनात धरुन दोघांनी अक्षय यास बिअर पाजण्यासाठी दारुंब्रे येथील संग्राम सोरटे याच्या नवीन बांधकाम सुरु असलेल्या व सध्या सुरु न झालेल्या हॉटेलजवळ नेले. बिअर पाजल्यानंतर कशाचे तरी सहाय्याने अक्षय याच्या डोके, पाय तसेच अंगावर जबर मारहाण केली. त्याला जीवे ठार मारल्यानंतर खुनाचा संशय येऊ नये, म्हणून त्याचा मृतदेह दीपक सोरटे यांच्या उसाचे शेतीच्या बाजूस असलेल्या पडीक शेतात नेऊन टाकून ते पळून गेले होते. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक अशोक केंद्रे (PSI Ashok Kendre) तपास करीत आहेत.