बहुजननामा ऑनलाईन : पिंपरी-चिंचवडमध्ये संत तुकाराम नगर प्रभागात पाणी कमी येत असल्याने भाजपाच्या महिला नगरसेविकेने टाकीवर चढून शोले स्टाईलमध्ये आंदोलन केले. भाजपच्या महिला नगरसेविका सुजाता पलांडे यांनी हे आंदोलन केले. गेल्या सहा दिवसापासून प्रभाग २० मध्ये कमी प्रमाणात पाणी येत आहे, तर काही ठिकाणी पाणी येत नसल्याची तक्रार त्यांच्याकडे नागरिकांनी केली होती. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या मात्र, त्यानी त्या गांभीर्याने न घेतल्याने त्यांना असे आंदोलन करावे लागले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपाचीच सत्ता आहे. त्यांच हे आंदोलन म्हणजे भाजपासाठी घरचा आहेर आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण हे भरून वाहू लागले आहे. त्यामुळे शहरातील नागिरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत आहे. परंतु, दुसरीकडे शहरातील प्रभाग क्रमांक २० संत तुकाराम नगर, महात्मा फुले नगर या परिसरात गेल्या सहा दिवसापासून कमी प्रमाणात पाणी येत आहे. तर काही ठिकाणी पाणी येत नसल्याची तक्रार भाजपा नगरसेविका सुजाता पालांडे यांच्याकडे नागरिकांनी केली होती.
जो पर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासने दिली नाहीत तोपर्यंत पालांडे यानी आंदोलन मागे घेतले नाही. शेवटी संध्याकाळी साडेसात वाजता अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर पालांडे यांनी आंदोलन मागे घेतले.