पुणे : बहुजननामा ऑनलाईन – लोणी काळभोर परिसरात फ्लॅटच्या वादातून एकाने पिस्तुल दाखवत धमकवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याजवळ पिस्तुलचा परवाना आहे. रामेश्वर यशवंत हरगुडे (वय 30, रा. केसनंद वाघोली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी म्हस्कु केरबा मोडक यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
देवाची उरुळी येथे फिर्यादी मोडक यांचे हॉटेल पुरंधर आहे. त्याठिकाणी फिर्यादी मोडक व सुदाम आंबेकर व पप्पू आंबेकर यांच्यात जुन्या फ्लॅटच्या व्यवहाराबाबत बोलणे सुरू होते. तर यावेळी पप्पू आंबेकर याचा मेव्हणा हरगुडे तेथे आला. त्याने फिर्यादी मोडक यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच कंबरेला लावलेले पिस्तुल बाहेर काढत “माझ्याकडे परवाना असलेले पिस्तुल आहे, तुला बघून घेतो, म्हणून धमकावले.
यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी तात्काळ हरगुडे याला अटक केली आहे. त्याच्याकडे पिस्तूलाचा परवाना असल्याचे सांगण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक झिंजूके, महिला उपनिरीक्षक काटे, पोलीस नाईक राणे, दिंगबर साळूखे यांच्या पथकाने केली आहे.