पुणे : बहुजननामा ऑनलाइन –शहरात संचारबंदी असताना देखील तंबाखूजन्य वस्तूंची विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे, 10 रुपयांची गायछाप 50 आणि गुटखा तिप्पट भावाने देण्यात येत आहे. अश्यावर पोलीस कारवाई करत असून, कोंढाव्यात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यास पकडले. त्याच्याकडून १४ हजारांचा तंबाखु साठा जप्त करण्यात आला.
अशोककुमार रामदेव यादव (वय ४५, रा. कोंढवा, मूळ-गाजीपुर, उत्तर प्रदेश) असे अटक आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचारबंदीत अनेकांकडून अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. कोंढव्यात बाबा तंबाखूची विक्री होत असल्याची माहिती संदीप साबळे यांना मिळाली. त्यानुसार खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अशोक कुमारला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, बाबा तंबाखूची विक्री करीत असल्याची कबुली त्याने दिली.
गेल्या काही दिवसात कोंढाव्यात तंबाखूजन्य ववस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल पिलाणे, संदीप साबळे, प्रकाश मोकाशी, उदय काळभोर यांच्या पथकाने केली.