पुणे : बहुजननामा ऑनलाइन – मार्केटयार्ड परिसरात टोळक्याने धुडगूस घालत 40 ते 50 वाहनांची तोडफोड प्रकरणात आणखी एकाला स्वारगेट पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. तर इतरांचा शोध सुरू आहे.
तेजस रामलाल यादव (वय 20, रा. मीनाताई ठाकरे वसाहत) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पुढील कारवाईसाठी त्याला मार्केटयार्ड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर वसाहतीत काल रात्री हातात तलवारी अन कोयते व दांडूके घेऊन आलेल्या टोळक्याने चांगलाच धुडगूस घालत 40 ते 50 वाहनांची तोडफोड करत अंधाधुंद गोंधळ घातला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी काही वेळातच चौघांना अटक केली होती. तर इतरांचा शोध सुरू होता. यादरम्यान स्वारगेट पोलीस गस्त घालत असताना पोलीस हवालदार सचिन कदम, ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी तेजस हा गुलटेकडी या भागात येणार आहे. त्यानुसार वरीष्ठ निरीक्षक बाळासाहेब कोपनर व त्यांच्या पथकाने याठिकाणी सापळा रचून त्याला पकडले. त्याला पुढील कारवाईसाठी मार्केटयार्ड पोलिसाच्या ताब्यात दिले आहे.