पुणे : बहुजननामा ऑनलाइन – शहराचा होणारा विस्तार लक्षात घेता, पुढील काळात विकास कामे आणि मुलभुत सुविधा पुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध करावा लागणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्यासाठी अभ्यास गट तयार करावा असे मत सभागृह नेते गणेश बीडकर यांनी व्यक्त केली. तर महापालिकेचे सरासरी उत्पन्न चार हजार ते साडे चार हजार कोटीच्या पुढे जात नसल्याची चिंताही सर्वसाधारणसभेत व्यक्त केली गेली. महापालिका प्रशासनाने ठेवलेल्या मिळकत करवाढीचा प्रस्ताव अमान्य केल्यानंतर सर्व पक्षाच्या गटनेत्यांनी आपली मते मांडली. त्यावेळी बीडकर यांनी महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्वपक्षीय अभ्यास गट तयार करण्याची कल्पना मांडली.
स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, कोरोना कालावधीत देशातील इतर महापालिकांचे उत्पन्न घटले. परंतु, पुणेकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे देशांत सर्वांत जास्त उत्पन्न मिळविणारी महापालिका म्हणून पुणे महापालिकेचे नाव झाले आहे. यामध्ये अभय योजनेतून महापालिकेच्या महसुलात सुमारे ४९२ कोटी रुपयांची भर पडली. सुमारे आठ लाख मिळकतदारांनी आजपर्यंत एक हजार ते बाराशे कोटी रुपये मिळकत कर जमा केला आहे. पुर्वी जकात हाच महापालिकेचा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत होता. जकात बंद झाल्यानंतर एलबीटी, व्हॅट आला. त्यानंतर जीएसटीचे उत्पन्न मिळत आहे. परंतु आता मिळकत कर हाच प्रमुख स्त्रोत असल्याचे दिसून येत आहे. बांधकाम विकसनशुल्कातूनही उत्पन्न मिळते. परंतु इतर उत्पन्नाच्या मार्गाचाही विचार करणे अपेक्षित आहे. यामध्ये जाहीरात फलक, मोबाईल टॉवर यांचे उत्पन्न कायदेशीर प्रक्रीयेत अडकून पडले आहे. ते उत्पन्न सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शहराची वाढ होत असताना, नियोजनबद्ध विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्र बसून मार्ग काढले पाहीजेत.
सभागृह नेते बीडकर यांनी शहरात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित प्रकल्पांच्या खर्चाचा उल्लेख करीत शहरांत सुमारे पन्नास हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सुरु असल्याची माहीती दिली. हे प्रकल्प लवकर पुर्ण होण्यासाठी महापालिकेचे उत्पन्न वाढले पाहीजे. शहरात अनधिकृत बांधकामांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. येथे राहणार्या नागरीकांना सर्व मुलभुत नागरी सुविधा मिळत आहे. परंतु, त्यांच्याकडून कोणताही कर मिळत नाही. त्यांना देखील कराच्या कक्षेत आणले पाहीजे. जायका प्रकल्पातून प्रक्रीया केलेले पाणी भविष्यात आपण विकू शकतो असे अनेक इतर उत्पन्नाचे मार्ग असुन, त्यावर सर्वांनी एकत्रित बसुन निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी पुढील काळात अभ्यास गट तयार केला जाईल.